स्पोर्ट्स

T20 World Cup Controversy | 'हे अत्यंत खालच्या पातळीचे...' : कीर्ती आझाद यांच्या धार्मिक विधानावर गौतम गंभीरने सोडले मौन

Gautam Gambhir on kirti azad religious remark | हरभजन सिंगनेही दिले सडेतोड प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

Gautam Gambhir on kirti azad religious remark

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी केलेल्या धार्मिक विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्‍हणाले होते कीर्ती आझाद ?

टी २० विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर २४ तासांच्या आत प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी ट्रॉफीसह जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या कृतीवर १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील समावेश असलेले माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत आक्षेप घेतला. आझाद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "मशीद का नाही? चर्च का नाही? गुरुद्वारा का नाही? ही ट्रॉफी प्रत्येक धर्माच्या १४० कोटी भारतीयांची आहे. हा केवळ एका धर्माचा विजयोत्सव नाही."

खेळाडूंच्‍या कष्‍टाचा अपमान करण्‍याचा कोणालाही अधिकार नाही

गौतम गंभीरने 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांच्यावर जोरदार टीका केली. तो म्हणाला, "या विषयावर बोलणेही मला योग्य वाटत नाही. हा संपूर्ण देशासाठी मोठा क्षण आहे आणि आपण विश्वचषकाचा आनंद साजरा करणे महत्त्वाचे आहे. अशा विधानांमुळे खेळाडूंच्या कर्तृत्वाचे महत्त्व कमी होते. १५ खेळाडूंनी घेतलेल्या कष्टांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खेळाडूंनी किती दडपण सहन केले आहे याचा विचार करा. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघ ज्या स्थितीत होता, तिथून त्यांनी भरारी घेतली. अशा वेळी अशी विधाने करून तुम्ही तुमच्याच खेळाडूंचा आणि संघाचा दर्जा खाली पाडत आहात. हे व्हायला नको होते."

कीर्ती आझादांचे वर्तन अत्‍यंत हास्‍यास्‍पद : हरभजन सिंग

किर्ती आझाद यांच्या विधानाचा समाचार घेताना हरभजन सिंग म्‍हणाला की, "कीर्ती आझाद जे काही करण्याचा प्रयत्न करत आहेत ते अत्यंत हास्यास्पद आहे. भारतीय संघ ट्रॉफी घेऊन मंदिर, मशीद, चर्च किंवा त्यांना जिथे हवे तिथे जाऊ शकतो. त्यांनी देवाकडे काही साकडे घातले असेल आणि इच्छा पूर्ण झाल्यावर ते तिथे कृतज्ञता व्यक्त करायला गेले असतील, तर त्यात अडचण काय?"

कीर्ती आझाद खेळापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देत आहेत

"एका माजी क्रिकेटपटूकडून अशा गोष्टी ऐकणे दुर्दैवी आहे. कदाचित ते खेळापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देत आहेत. आपल्या संस्कृतीत सर्व धर्म सारखेच मानले जातात. देव वेगवेगळे असू शकतात; पण मार्ग एकच आहे. खेळाडूंच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. देशाने विश्वचषक जिंकला आहे, त्याचा आनंद साजरा करा, राजकारण करू नका."

कृपया चांगले प्रश्‍न विचारा : इशान किशन

दरम्यान, विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेला यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याला पाटणा विमानतळावर पत्रकारांनी या वादाबद्दल विचारले असता, त्याने अत्यंत शांतपणे या प्रश्नाला बगल दिली. इशान म्हणाला, "आम्ही इतका शानदार विश्वचषक जिंकून आलो आहोत, कृपया चांगले प्रश्न विचारा. कीर्ती आझाद काय म्हणाले यावर मी काय बोलणार? आम्हाला किती आनंद झाला आणि हा प्रवास कसा होता, याबद्दल विचारा." इशानने वादात पडण्याऐवजी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्‍याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT