Mangesh Yadav IPL 2026 Story: क्रिकेटमध्ये येण्याचा मार्ग कधीच सरळ नसतो. तो संघर्षातून, कठीण परिस्थितीतून आणि मेहनतीतून तयार करावा लागतो. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची क्रिकेटविश्वात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या खेळाडूचं नाव आहे मंगेश यादव. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची कहाणी प्रेरणादायी आहे.
गरीबीशी दोन हात करत, वडिलांच्या कष्टांवर उभं राहिलेलं हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे. कारण IPL 2026 साठी झालेल्या मिनी लिलावात Royal Challengers Bengaluru ने मंगेश यादवला तब्बल 5.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. इथपर्यंत पोहचण्याचा खेळाडूचा प्नवास सोपा नव्हता.
मंगेश यादव नुकताच आपल्या वडिलांसोबत ‘RCB Bold Diaries’ मध्ये दिसला. तिथे त्याचे वडील रामावध यादव यांनी आपल्या आयुष्याची कहाणी सांगितली. जी ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
त्यांनी सांगितलं की, “ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य फार कठीण आहे. वेळेवर जेवण नाही, अंघोळीसाठी वेळ नाही. ट्रक भरलेला असेल तर माल उतरवायची चिंता आणि रिकामा असेल तर पुन्हा लोड करण्यासाठी धडपड.”
पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे मुलाचं स्वप्न. “अनेकदा रात्री झोप लागत नव्हती. पैसे कुठून आणायचे याची चिंता असायची. गाडी चालवताना देखील तेच विचार डोक्यात असायचे,” असं त्यांनी भावुक होत सांगितलं.
मंगेशच्या यशामागे फक्त वडिलांचाच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा वाटा आहे. त्याचे काका आणि कोच फूलचंद शर्मा यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि गावातून थेट दिल्लीपर्यंत नेलं. तिथून त्याच्या करिअरला खरी दिशा मिळाली.
लहानपणी मंगेश नेहमी मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जायचा, पण भांडणं झालं की तो रडत घरी यायचा. अशा वेळी त्याची आईच त्याची कोच बनली. घराच्या छोट्या अंगणात ती गोलंदाजी करायची आणि मंगेश तासन्तास सराव करत राहायचा.
मध्य प्रदेश टी20 लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर मंगेश यादवचं नाव चर्चेत आलं. त्याच्या वेगवान गोलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि अखेर IPLचं दार त्याच्यासाठी उघडलं. सध्या Royal Challengers Bengaluru च्या काही वेगवान गोलंदाजांना दुखापती झाल्यामुळे मंगेशला लवकरच IPLमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.
RCB आपला IPL 2026चा पहिला सामना Sunrisers Hyderabad विरुद्ध 28 मार्चला खेळणार आहे. या सामन्यात मंगेशला संधी मिळते का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
मंगेश यादवची कहाणी ही फक्त क्रिकेटची नाही, तर जिद्दीची, कष्टाची आणि कुटुंबाच्या पाठिंब्याची आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी स्वप्न मोठं असेल आणि मेहनत केली, तर यशाचा मार्ग नक्की सापडतो.