मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक नवा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून तो पाहून क्रीडाप्रेमींमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या व्हिडिओमध्ये कांबळी ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या एका वृद्धाश्रमात वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या या मातब्बर खेळाडूची ही सद्यस्थिती पाहून चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओत स्वतः विनोद कांबळी मात्र त्या आश्रमातील व्यवस्था आणि तिथल्या प्रेमळ वातावरणाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कांबळींनी आश्रमातील अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. ते म्हणाले की, सध्या मी ‘निदान’ या केअर सेंटरमध्ये राहत असून येथील सोयी-सुविधा अत्यंत दर्जेदार आहेत. आश्रमातील व्यवस्थेची प्रशंसा करताना त्यांनी सांगितले की, येथील स्वच्छता, काळजी घेण्याची पद्धत आणि इतर सर्व बाबी अगदी उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. येथे राहत असताना मला आपण आपल्या घरापासून दूर आहोत, असा जराही भास होत नाही. येथील सर्व कर्मचाऱ्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून मला भरभरून प्रेम व आदर मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
हा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्या ढासळत्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. गेल्या काही वर्षांपासून विनोद कांबळी हे सातत्याने गंभीर आजारपण, आर्थिक चणचण आणि कौटुंबिक अडचणींमुळे चर्चेत राहिले आहेत. यापूर्वीही त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्यांना दुसऱ्या कोणाच्या तरी आधाराशिवाय स्वतःच्या पायावर नीट चालणेही शक्य होत नव्हते. त्या दृश्यांनी देशभरातील क्रिकेट चाहत्यांची मने हेलावून टाकली होती.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विनोद कांबळीने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. त्यांने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले असून ५४ च्या उल्लेखनीय सरासरीने १,०८४ धावा फटकावल्या आहेत; यात ४ शतकांचा समावेश आहे. भारतासाठी कसोटीत सर्वांत जलद १,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम आजही त्याच्याच नावावर अबाधित आहे. अलीकडेच युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला होता; मात्र त्याने हा टप्पा १६ डावांत गाठल्याने कांबळींचा १४ डावांतील विक्रम कायम राहिला. याशिवाय कांबळीने भारताकडून १०४ एकदिवसीय सामने खेळताना ३२ च्या सरासरीने २ शतके आणि १४ अर्धशतकांसह २,४७७ धावा केल्या आहेत.