Finn Allen World Record: आयपीएल २०२६ मध्ये सध्या एका फलंदाजाची जोरदार चर्चा रंगली आहे. मैदानात उतरला की चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू म्हणजे फिन ॲलन. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या फिन अॅलनने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेटविश्वाला थक्क केले आहे.
८ मे रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवले आणि सहज विजय मिळवला. या सामन्यात फिन अॅलनने अवघ्या ४७ चेंडूत नाबाद १०० धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि तब्बल १० षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने २१२.७७ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १४३ धावांचे लक्ष्य KKR ला केवळ १४.२ षटकांत गाठून दिले.
दिल्लीविरुद्धचे शतक ही फक्त झलक होती. कारण फिन अॅलनच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील असा विक्रम आहे, जो मोडणे जवळपास अशक्य मानले जाते.
१२ जून २०२५ रोजी Major League Cricket स्पर्धेत अॅलनने धुमाकूळ घातला होता. San Francisco Unicorns कडून खेळताना Washington Freedom विरुद्ध त्याने अवघ्या ५१ चेंडूत १५१ धावांची वादळी खेळी केली होती. या डावात त्याने ५ चौकार आणि तब्बल १९ षटकार ठोकले होते.
टी-२० क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेल आणि साहिल चौहान यांच्या नावावर १८ षटकारांसह होता. मात्र फिन अॅलनने १९ षटकार मारत दोघांनाही मागे टाकले.
फिन अॅलनची फलंदाजी पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. तो मोठी खेळी करताना चौकारांपेक्षा षटकारांवर जास्त भर देतो. गेल्या एका वर्षात त्याने तीन टी-२० शतके झळकावली आहेत.
Big Bash League २०२६ मध्ये Perth Scorchers कडून खेळताना त्याने ५३ चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये न्यूझीलंडसाठी ३३ चेंडूत शतक झळकावले. आता KKR साठी ४७ चेंडूत शतक करत त्याने आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे.
विशेष म्हणजे, एका वर्षात तीन टी-२० शतके करणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्यामुळेच क्रिकेट चाहते आता त्याला ‘सिक्सर मशीन’ म्हणू लागले आहेत. फिन अॅलनचा फॉर्म पाहता येत्या काळात आणखी अनेक विक्रम मोडले जाऊ शकतात, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.