ईडन गार्डन्सवर टी २० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंड संघाने द. आफ्रिकेला 20 षटकांत 8 बाद 169 धावांवर रोखले आणि 170 धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या बदल्यात 12.5 षटकांतच पूर्ण केले.
Fin Allen on Indian factor
कोलकाता : सलामीवीर फिन ॲलनने अवघ्या 33 चेंडूंत ठोकलेल्या विक्रमी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला. आता फिन ॲलनने आपल्या स्मरणीय खेळीबाबत 'इंडियन फॅक्टर' महत्त्वाचा ठरल्याचे म्हटले आहे.
सामन्यानंतर बोलताना ॲलनने आपल्या झंझावाती खेळीचे श्रेय भारताबरोबरील मालिकेला दिले. तो म्हणाला, "विश्वचषकापूर्वी भारतासोबत झालेली ५ सामन्यांची मालिका आमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरली. त्या मालिकेतील काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव उपांत्य सामन्यात खूप कामी आला. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी अशा प्रकारची तयारी इतर कुठेही होऊ शकली नसती."
"आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेवर दबाव निर्माण केला. त्यामुळे फलंदाजांचे काम सोपे झाले. सलामीचा जोडीदार टिम सायफर्टच्या (३३ चेंडूत ५८ धावा) फटकेबाजीमुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचेही ॲलनने सांगितले.
विशेष म्हणजे, आगामी आयपीएलमध्ये ॲलन २ कोटींच्या बोलीसह कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) याच मैदानावर खेळताना दिसणार आहे. आपल्या भावी 'होम ग्राउंड'वर पहिलेच शतक झळकावल्याचा आनंदही सामना जिंकल्यानंतर त्याने व्यक्त केला.
महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा कच खाल्ल्याने दक्षिण आफ्रिका संघावर टीकेची झोड उठत आहे. मात्र, प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी हा पराभव दडपणामुळे नाही तर सपाटून झालेला पराभव होता, असे संघाला सुनावले आहे.
कॉनराड म्हणाले की, बुधवारी रात्री आमच्या संघाचा झालेला पराभव हा 'चोक' नव्हता, तर हा आमचा सपाटून झालेला पराभव होता. 'चोक' तेव्हा म्हणतात जेव्हा तुमच्याकडे विजयाची थोडी तरी संधी असते. आज आम्हाला संधीच मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकन भाषेत सांगायचे तर, हा एक जोराचा 'स्नॉटक्लॅप' (अनपेक्षित चपराक) होता. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी सुरुवातीलाच सामन्यावर पकड मिळवली. यानंतर आम्हाला सावरण्याची संधीच दिली नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. पराभवामुळे दुःख असले तरी, सलग ७ सामने जिंकून उपांत्य फेरीपर्यंत मारलेल्या मजलचा सार्थ अभिमान असल्याचे कॉनराड यांनी स्पष्ट केले.