

Sunil Gavaskar on T20 World Cup 2026 semi final
मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपांत्य फेरीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. २०२२ आणि २०२४ च्या उपांत्य फेरीतील लढतींचीच ही पुनरावृत्ती असेल. २०२२ मध्ये अॅडलेडमध्ये इंग्लंडने भारतावर १० गडी राखून मात केली होती, तर दोन वर्षांनंतर रोहित शर्माच्या संघाने वेस्ट इंडिजमधील प्रॉव्हिडन्स येथे इंग्लंडला धूळ चारत पराभवाची परतफेड केली होती. आता संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या सामन्याकडे लागले असून यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या सामन्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
भारतीय संघातील दमदार फलंदाज आणि जसप्रीत बुमराहसारखा वेगवान गोलंदाज यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत भारताचे पारडे थोडे जड असेल, अशी अपेक्षा व्यक्त करत दोन्ही संघ अत्यंत संतुलित आहेत. त्यांच्याकडे दर्जेदार फलंदाजी आणि गोलंदाजी आहे. मधली फळी आणि फिनिशर्स देखील आहेत. दोन्ही संघांच्या गोलंदाजीत विविधता आहे," असे सुनील गावसकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
"इंग्लंडच्या संघात आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना भारतीय परिस्थितीची आणि बाद फेरीच्या सामन्यांमधील दबावाची चांगली जाण आहे. त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा होईल यात शंका नाही. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज तिलक वर्मा हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बुमराह आणि फॉर्मात असलेला हॅरी ब्रूक यांच्यातील द्वंद्व सामन्याचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही गावसकर म्हणाले.
"माझ्या मते बुमराहने पॉवरप्लेमध्ये किमान दोन षटके टाकली पाहिजेत. नवीन चेंडूचा गोलंदाज म्हणून जर त्याने जोस बटलर, फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्या लवकर विकेट्स घेतल्या, तर तो इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडून काढेल. तो जर पाचव्या षटकात गोलंदाजीला आला, तोपर्यंत फलंदाजांनी साधारण २० चेंडू खेळलेले असतात आणि ते खेळपट्टीवर स्थिरावलेले असतात. त्याऐवजी बुमराहने सुरुवातीलाच गोलंदाजी करून त्यांना बाद करणे भारतासाठी अधिक फायद्याचे ठरेल," असे त्यांनी नमूद केले.
बुमराह क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये इतका यशस्वी का आहे? याचे उत्तर देताना गावस्कर यांनी आंद्रे आगासीच्या 'ओपन' या आत्मचरित्राचे उदाहरण दिले. बोरिस बेकर सर्व्हिस कुठे करणार हे ओळखण्यासाठी आगासीला त्याच्या जिभेच्या हालचालींवरून कसं समजावं लागलं, याचा संदर्भ देत गावसकर म्हणाले की, बुमराहच्या बाबतीत मात्र असं काहीच नसतं. तो फलंदाजाला काहीच अंदाज येऊ देत नाही. त्यामुळे तो कसा चेंडू टाकणार आहे याचा अंदाज बांधणे खूप कठीण आहे.त्यामुळेच तो तिन्ही फॉरमॅटमध्ये घातक गोलंदाज ठरला आहे."
गावस्कर म्हणाले, भारतीय संघाची फलंदाजी मोठी आहे. त्यांनी या स्पर्धेत विविध क्रमांकांवर खेळणाऱ्या तिलक वर्माचे उदाहरण दिले. संजू सॅमसनचा संघात समावेश झाल्यानंतर तिलक तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आला. सुपर-८ मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. गावसकर म्हणाले, तिलक वर्मा हा अतिशय चतुर क्रिकेटपटू आहे. तो परिस्थितीचे अचूक आकलन करून खेळतो. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे सॅमसनवरील दबाव कमी झाला. भारताकडे तिलकसारखे खेळाडू असणे हे नशीब आहे. कारण असे फलंदाज कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतात."
इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टीम इंडियाने त्याला गृहित धरू नये. हे महागात पडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. जोस बटलर हा अभिषेक शर्मासारखाच धोकादायक खेळाडू आहे. तो कधीही फॉर्मात येऊ शकतो, त्यामुळे त्याची विकेट लवकर मिळवणे भारतासाठी महत्त्वाचे ठरेल," असा सल्लाही गावस्कर यांनी टीम इंडियाला दिला आहे.