स्पोर्ट्स

Mexico Free Condoms FIFA World Cup : 13 सामने.. 70 लाख कंडोमचे मोफत वाटप! मेक्सिकोची भन्नाट तयारी

मेक्सिको रचणार इतिहास; तिसऱ्यांदा यजमानपद भूषवणारा पहिला देश

रणजित गायकवाड

फिफा विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास अवघा एक दिवस शिल्लक आहे. दरम्यान स्पर्धेच्या यजमान देशांपैकी एक असलेल्या मेक्सिकोने आपल्या तयारीमुळे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. फुटबॉलच्या महाकुंभासाठी लाखो चाहत्यांच्या स्वागताची तयारी करत असतानाच मेक्सिकोने सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देणारा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. स्पर्धेदरम्यान देशभरात तब्बल 70 लाख मोफत कंडोमचे वाटप करण्यात येणार असून हा उपक्रम सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

लैंगिक संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखणे, एचआयव्ही विषयी जनजागृती करणे आणि सुरक्षित आरोग्यविषयक सवयींना प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचे मुख्य उद्देश आहे, असल्याचे तेथील प्रशानाने स्पष्ट केले आहे.

यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी होत असून एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 13 सामने मेक्सिकोमध्ये होणार रंगणार आहेत. विशेष म्हणजे, 1970 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा विश्वचषकाचे सामने आयोजित करणारा मेक्सिको हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

मेक्सिकोतील कोणत्या शहरांमध्ये सामने?

मेक्सिकोतील 3 शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने रंगणार

  • मेक्सिको सिटी (इस्तादियो ॲझ्टेका) : 5 सामने (प्रेक्षक क्षमता-सुमारे 83,000)

  • ग्वाडालाजारा (इस्तादियो ग्वादालाहारा) : 4 सामने (प्रेक्षक क्षमता : सुमारे 48,000)

  • मॉन्टेरे (इस्तादियो मॉन्टेरी) : 4 सामने (प्रेक्षक क्षमता : सुमारे 53,500)

या तिन्ही मैदानांमध्ये मिळून जवळपास 1.84 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामने पाहू शकतील.

उद्घाटनाचा ऐतिहासिक सामना मेक्सिकोत

या विश्वचषकाचा उद्घाटन सामना ११ जून रोजी मेक्सिको सिटीतील ऐतिहासिक 'इस्तादियो ॲझ्टेका' येथे रंगणार आहे. या मैदानाची भव्यता आणि इतिहास अद्भूत आहे. यापूर्वी १९७० आणि १९८६ च्या विश्वचषकाचे ऐतिहासिक क्षण या मैदानाने अनुभवले आहेत. आता २०२६ च्या उद्घाटनासह, तीन वेगवेगळ्या विश्वचषकांचे उद्घाटन सामने आयोजित करणारे हे जगातील पहिले स्टेडियम म्हणून इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवले जाईल.

कुठे मिळणार मोफत कंडोम

मेक्सिकोच्या आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या विश्वचषक आरोग्य संचालन पथकातील सदस्य रॉक्साना ट्रेजो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विश्वचषकादरम्यान कंडोमचे मोफत वाटप होणार आहे. यासाठी विमानतळ आणि विविध प्रवेश केंद्रांवर विशेष सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना कंडोमसोबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारी पुस्तिकाही दिली जाईल. कारण केवळ कंडोम देणे पुरेसे नसून त्यासोबत योग्य माहिती देणे तितकेच महत्त्वाचे आहे.’

ही मोहीम केवळ स्टेडियम परिसरापुरती मर्यादित नाही. विमानतळ, पर्यटनस्थळे, बार, रेस्टॉरंट्स तसेच फुटबॉल चाहत्यांची मोठी गर्दी होणारी ठिकाणे येथे देखील कंडोम वितरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कंडोम वितरण

गेल्या चार दशकांपासून ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कंडोम वितरण ही नियमित बाब बनली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान सुमारे तीन लाख कंडोम खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. ही परंपरा १९८८ च्या सोल ऑलिम्पिकपासून सुरू झाली. सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी जागरूकता निर्माण करणे हा त्यामागील उद्देश आहे.

फिफा विश्वचषकात मात्र अशा प्रकारचे एकत्रित खेळाडू ग्राम नसल्याने फिफाकडून कोणतीही स्वतंत्र कंडोम वितरण योजना राबविली जात नाही. त्याऐवजी यजमान देश आणि स्थानिक प्रशासन स्पर्धेसाठी येणाऱ्या लाखो चाहत्यांमध्ये जनजागृती करण्यावर आणि मोफत वितरण मोहिमा राबविण्यावर भर देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT