FIFA World Cup: फुटबॉलच्या 'DNA'चा अद्भूत चमत्कार! २८ वर्षांपूर्वी 'दोन बाप' एकत्र खेळले वर्ल्डकप, आता 'मुलं' घालणार धुमाकूळ

Argentina Football Legacy : वडिलांचा वारसा, मुलांचे स्वप्न.. १९९८ ची २०२६ मध्ये पुनरावृत्ती
FIFA World Cup: फुटबॉलच्या 'DNA'चा अद्भूत चमत्कार! २८ वर्षांपूर्वी 'दोन बाप' एकत्र खेळले वर्ल्डकप, आता 'मुलं' घालणार धुमाकूळ
Published on
Updated on

फुटबॉल हा केवळ ९० मिनिटांचा खेळ नाही, तर तो पिढ्यानपिढ्या रक्तामध्ये वाहणारा एक अद्भूत 'DNA' आहे... याचीच एक थरारक प्रचिती सध्या फुटबॉल जगताला आली आहे. तब्बल २८ वर्षांपूर्वी १९९८ च्या वर्ल्डकपमध्ये ज्या दोन रणधुरंदरांनी अर्जेंटिनाची शान वाढवण्यासाठी मैदानात रक्ताचं पाणी केलं होतं, आज त्यांचेच 'रक्ताचे वारसदार' तोच वारसा पुढे नेण्यासाठी एकत्र आले आहेत. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून आता ही मुलं यंदा अमेरिकेचं मैदान गाजवायला सज्ज झाली असून, नियतीचा हा अद्भूत चमत्कार पाहून जगभरातील फुटबॉलप्रेमी थक्क झाले आहेत.

२८ वर्षांपूर्वीचा 'तो' इतिहास...

गोष्ट आहे १९९८ च्या फिफा विश्वचषकाची. अर्जेंटिनाच्या पट्टेरी निळ्या-पांढ-या जर्सीमध्ये डिएगो सिमिओन (Diego Simeone) आणि पाब्लो पाझ (Pablo Paz) हे दोन दिग्गज खेळाडू मैदानावर एकत्र उतरले होते. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या जोडीने फुटबॉल जगतात आपला एक वेगळा ठसा उमटवला. त्या ऐतिहासिक क्षणांना आता २८ वर्षे उलटून गेली आहेत, पण काळ बदलला तरी इतिहास स्वतःची पुनरावृत्ती कशी करतो, याचं जिवंत उदाहरण आता समोर आलं आहे.

वडिलांचा वारसा, मुलांचे स्वप्न!

काळ बदलला तरी फुटबॉलचा 'DNA' कसा बदलत नाही, याचंच जिवंत उदाहरण म्हणजे डिएगो सिमिओन यांचा सुपुत्र जियुलियानो सिमिओन (Giuliano Simeone) आणि पाब्लो पाझ यांचा मुलगा निको पाझ (Nico Paz)! २८ वर्षांपूर्वी ज्या दोन मित्रांनी अर्जेंटिनासाठी मैदान गाजवलं होतं, आज त्यांचीच मुलं राष्ट्रीय संघाच्या माध्यमातून एकत्र आली आहेत. ज्या प्रतिष्ठित निळ्या-पांढऱ्या जर्सीसाठी त्यांच्या वडिलांनी रक्ताचं पाणी केलं, नेमकी तीच जर्सी परिधान करून हे दोन शिलेदार २०२६ च्या फिफा विश्वचषकात उतरणार आहेत. जागतिक फुटबॉलच्या इतिहासात दोन सहकाऱ्यांची मुलं एकाच कालखंडात, एकाच आंतरराष्ट्रीय संघात खेळण्याची ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना ठरली आहे.

सोशल मीडियावर भावनांचा पूर...

नियतीचा हा अद्भूत खेळ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर क्रीडाप्रेमींनी ‘फुटबॉल खरोखरच खूप सुंदर आहे!’ अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. चाहत्यांच्या मते, हा निव्वळ योगायोग नसून फुटबॉल देवतेने स्वतःच्या हाताने लिहिलेली एक देखणी पटकथा आहे. वडिलांचा तोच आक्रमकपणा, तीच चपळाई आणि देशावरील तीच निष्ठा घेऊन आता जियुलियानो आणि निको ही जोडगोळी अमेरिकेच्या भूमीवर काय कमाल करते, याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे डोळे लागले आहेत. पिढ्या बदलल्या, चेहरे बदलले, पण अर्जेंटिनाच्या फुटबॉलचा रक्तारक्तात भिनलेला तोच जज्बा आजही तितकाच जिवंत आहे, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news