FIFA World Cup Final Controversy Pudhari
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 Final: फिफा विश्वचषक फायनलनंतर मैदानावर राडा; अर्जेंटिना आणि स्पेनच्या खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी

FIFA World Cup 2026 Final: 2026 फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिना आणि स्पेनच्या खेळाडूंमध्ये मैदानावर जोरदार वाद झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 Final: 2026 फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर मैदानावर अनपेक्षित गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील मेटलाईफ स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्याची शिट्टी वाजताच अर्जेंटिना आणि स्पेनच्या खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच हा वाद इतका वाढला की दोन्ही संघांचे खेळाडू आणि प्रशिक्षक मंडळी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांशी आक्रमक पद्धतीने वाद घालताना दिसत आहेत. परिस्थिती चिघळू नये म्हणून प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. काही खेळाडूंना सहकाऱ्यांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मागे ओढून शांत करण्याचाही प्रयत्न केला.

सामन्यानंतर काही क्षणांतच मैदानावरील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. दोन्ही संघांमधील वादाचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, सामन्यादरम्यान झालेले टॅकल्स, भावनिक वातावरण आणि अंतिम निकालामुळे हा तणाव निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून फुटबॉल चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर फिफा या प्रकाराची चौकशी करणार का आणि संबंधित खेळाडूंवर काही शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर अशा प्रकारे मैदानावर गोंधळ उडाल्याने क्रीडा विश्वातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT