

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : या सामन्यात फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना एका अशा वळणावर पोहोचला होता जिथे प्रत्येक सेकंदाला इतिहास बदलत होता. संपूर्ण सामन्यात स्पेनने बॉलवर नियंत्रण ठेवत गोलपोस्टवर प्रचंड मारा केला; मात्र अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने एकामागून एक अद्भुत सेव्हज करत स्पेनच्या तोंडचे पाणी पळवले होते; परंतु अर्जेंटिनाचे केवळ गोलरक्षकाच्या बळावरील हा लढा पुढे फार काळ टिकला नाही. मोक्याच्या क्षणी स्पेनच्या टोरेसने चक्रव्यूह भेदत चेंडू थेट जाळ्यात धाडला आणि यानंतर जणू हा सामना स्पेनने येथेच जिंकला होता.
पहिला गोल झाल्यानंतर स्पेनने आणखी आक्रमक पवित्रा घेतला आणि केवळ १० खेळाडूंनिशी खेळत असलेल्या अर्जेंटिनावर दडपण वाढत गेले. मेस्सीचा करिष्मा येथे बहरेल, अशी भोळी अपेक्षा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना असणे साहजिकच होते; पण मेस्सीकडे पास देणारी सप्लाय चेन स्पेनने चांगलीच रोखून धरली आणि हाच या सामन्याचा खर्याअर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. पहिला गोल केल्यानंतर स्पॅनिश ब्रिगेडने आणखी एकदा गोलजाळ्याचा वेध घेतला; मात्र तो अवैध ठरला. अर्थात, स्पेनने त्यापूर्वीच बाजी मारली होती आणि अवांतर वेळेनंतर सामना संपल्याची शिटी वाजताच त्यांच्या जगज्जेतेपदावर अगदी थाटात शिक्कामोर्तब झाले.
असा रंगला ९० मिनिटांचा थरार
फिफा वर्ल्डकपच्या या महाअंतिम सामन्यात कमालीचा थरार पाहायला मिळाला. जगज्जेत्या अर्जेंटिना आणि युरोपियन चॅम्पियन स्पेन यांच्यात प्रारंभी ९० मिनिटांचा खेळ गोलशून्य बरोबरीत सुटला आणि यामुळे ३० मिनिटांच्या जादा वेळेचा अवलंब करण्यात आला होता.
९० मिनिटांचा खेळ संपण्यापूर्वी अर्जेंटिनाला रेड कार्ड मिळाल्याने त्यांचा संघ १० खेळाडूंसह मैदानात झुंजत हाेता. स्पॅनिश ब्रिगेडने जोरदार आक्रमणे केली; मात्र अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने त्यांचे सर्व हल्ले यशस्वीरीत्या परतावून लावले होते.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्पेनने चेंडूवर ६५ टक्क्यांपेक्षा जास्त नियंत्रण राखत अर्जेंटिनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. स्पेनच्या मजबूत बचावापुढे अर्जेंटिनाच्या आक्रमक फळीला पूर्वार्धात गोलपोस्टवर एकही अचूक शॉट मारता आला नाही. त्यातच ४४ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा मुख्य डिफेंडर लिसान्द्रो मार्टिनेझ दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेल्याने अर्जेंटिनाला मोठा धक्का बसला होता.
मार्टिनेझची झुंज
निर्धारित ९० मिनिटांच्या खेळातील दुसर्या सत्रात स्पेनच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार आणखी तीव्र केली. डॅनी ओल्मो आणि लॅमिन यमाल यांनी अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर एकामागून एक तब्बल १६ जोरदार शॉटस् डागले; मात्र अर्जेंटिनाचा स्टार गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझ स्पेनच्या आक्रमणासमोर भिंत बनून उभा राहिला. त्याने १० अप्रतिम सेव्हज करत स्पेनला गोल करण्यापासून रोखले होते. अंतिमत: त्याची झुंज व्यर्थ ठरली.
पहिल्या हाफमधील ठळक बाबी
स्पेनचे वर्चस्व : स्पेनच्या संघाने पहिल्या ४५ मिनिटांत तब्बल ६४ % बॉल पोझेशनसह खेळावर पूर्ण नियंत्रण राखले. त्यांनी अर्जेंटिनाच्या बचावावर सातत्याने दबाव निर्माण केला.
अर्जेंटिनाचा संघर्ष : गतविजेत्या अर्जेंटिनाला केवळ ३६% बॉल पोझेशन राखता आले. मेसीच्या नेतृत्वाखालील संघाला आक्रमणात फारशा संधी मिळाल्या नाहीत.
बदली खेळाडू आणि यलो कार्ड : सामन्याच्या ४१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या लिसांद्रो मार्टिनेझला यलो कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर लगेचच ४३ व्या मिनिटाला त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि त्याच्या जागी दुसरा खेळाडू मैदानात आला.
बचावफळीची कसोटी : दोन्ही संघांच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पूर्वार्धात एकही गोल होऊ शकला नाही आणि स्कोअर ०-० असा बरोबरीत राहिला होता.