England Announce Squad For Ashes Series 2025 vs Australia
इंग्लंडने अगामी ॲशेस मालिकेसाठी 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर, न्यूझीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-20 संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. ॲशेस मालिकेची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून पर्थ येथील कसोटी सामन्याने होणार आहे. या मालिकेय 5 कसोटी सामने खेळले जाणार असून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.
खांद्याच्या दुखापतीतून सावरत असलेला बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार असेल. तसेच मॅथ्यू पॉट्स आणि विल जॅक्स यांनी संघात स्थान मिळवले आहे. जॅक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती, परंतु तो ॲशेससाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
ड्युरहॅमचा वेगवान गोलंदाज पॉट्सने डिसेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती, तर सरेचा जॅक्स डिसेंबर 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. यंदाच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पॉट्सने 10 सामन्यांत 28 बळी घेतले आहेत. 84 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. जॅक्सने तीन डावांत 136 धावाही केल्या आहेत.
हॅरी ब्रूकची ॲशेस मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने ऑली पोपची जागा घेतली आहे. मार्क वूडने गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन केले आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत बोटाला दुखापत झालेल्या शोएब बशीरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बशीरला लॉर्ड्स कसोटीत बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला भारताविरुद्धची मालिका अर्धवट सोडावी लागली होती.
स्टोक्सव्यतिरिक्त, संघात जो रूट, झॅक क्रॉली, बेन डकेट आणि पोप यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी जेमी स्मिथ सांभाळणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान पुनरागमन केलेला जोफ्रा आर्चर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत ब्रायडन कार्स, गस ॲटकिन्सन, जोश टोंग, वूड आणि पॉट्स यांचा वेगवान गोलंदाजीच्या फळीत समावेश आहे. बशीर हा संघाचा मुख्य फिरकीपटू असून, रूट, जेकब बेथेल आणि जॅक्स यांच्याकडेही फिरकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
दरम्यान, भारताविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या कसोटीदरम्यान खांद्याची दुखापत झालेल्या ख्रिस वोक्सला ॲशेससाठी निवडण्यात आलेले नाही. 36 वर्षीय वोक्सने दुखापतीकडे दुर्लक्ष करत, हाताला दुखापत होऊनही अंतिम दिवशी फलंदाजी केली होती.
झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, जोश टोंग, मार्क वूड, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, शोएब बशीर.
ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे, ज्यात तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळले जातील. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेला हॅरी ब्रूक पुन्हा संघाचे नेतृत्व करेल. डकेट, स्मिथ आणि आर्चर यांना टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, तर झॅक क्रॉलीला प्रथमच टी-20 संघात स्थान मिळाले आहे.
एकदिवसीय संघात सॅम कुरन आणि लियाम डॉसन यांचे पुनरागमन झाले आहे. तर ल्युक वूडला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. रेहान अहमद, बेथेल, सोनी बेकर आणि जेमी ओव्हर्टन या सर्वांना मर्यादित षटकांच्या दोन्ही संघांमध्ये स्थान मिळाले आहे. साकिब महमूदला मात्र गुडघ्याच्या किरकोळ शस्त्रक्रियेमुळे न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या दोन्ही संघातून वगळण्यात आले आहे.
हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, आदिल रशीद, जो रूट, जेमी स्मिथ, ल्युक वूड.
हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, सॅम करन, लियाम डॉसन, जेमी ओव्हर्टन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ल्युक वूड.
न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे टी-20 सामन्याने होईल. त्यानंतर 26 ऑक्टोबरपासून माउंट माउंगानुई येथे एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. ही मालिका 1 नोव्हेंबर रोजी संपेल. ॲशेससाठी निवडलेला संघ नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पर्थमध्ये एकत्र येईल. 21 नोव्हेंबरपासून पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जाईल. त्यानंतर उर्वरीत सामने ब्रिस्बेन, ॲडलेड आणि मेलबर्न येथे खेळले जातील. तर जानेवारीच्या सुरुवातीस सिडनी येथील कसोटीने मालिकेचा समारोप होईल.
टी-20 मालिका
पहिला टी-20 सामना : 18 ऑक्टोबर, क्राइस्टचर्च
दुसरा टी-20 सामना : 20 ऑक्टोबर, क्राइस्टचर्च
तिसरा टी-20 सामना : 23 ऑक्टोबर, ऑकलंड
वनडे मालिका
पहिला एकदिवसीय सामना : 26 ऑक्टोबर, माउंट माउंगानुई
दुसरा एकदिवसीय सामना : 29 ऑक्टोबर, हॅमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना : 1 नोव्हेंबर, वेलिंग्टन
पहिली कसोटी : 21-25 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 4-8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरी कसोटी : 17-21 डिसेंबर, ॲडलेड
चौथी कसोटी : 25-29 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी 2026, सिडनी