स्पोर्ट्स

Tilak Varma Century : संकटकाळात कॅप्टन तिलक वर्माची शतकी खेळी! श्रेयससोबत १७५ धावांची भागीदारी, साउथ झोनला ९० धावांची आघाडी

Duleep Trophy : गुरनूरची भेदक गोलंदाजी, पडझडीनंतर साउथ झोनचे जोरदार पुनरागमन

रणजित गायकवाड

मुंबई : दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार तिलक वर्माच्या उत्कृष्ट शतकी खेळीच्या जोरावर साउथ झोनने नॉर्थ झोनविरुद्ध भक्कम आघाडी मिळवली आहे. नॉर्थ झोनच्या पहिल्या डावातील १९५ धावांच्या प्रत्युत्तरात साउथ झोनने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ९ बाद २८५ धावा रचून ९० धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे. नॉर्थ झोनकडून वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने अचूक टप्प्यावर भेदक मारा करत ४ बळी टिपले.

साउथ झोनची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. धावफलकावर ३९ धावा असताना दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार तिलक वर्मा खेळपट्टीवर आला. मात्र, एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेल्याने साउथ झोनची अवस्था ५ बाद ८० धावा अशी बिकट झाली होती.

या पडझडीच्या काळात तिलकला श्रेयस गोपालची मोलाची साथ लाभली. या दोघांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजीचा मिलाफ साधत सहाव्या विकेटसाठी तब्बल १७५ धावांची बहुमूल्य भागीदारी रचली आणि संघाची धावसंख्या ८० वरून थेट २५५ धावांपर्यंत नेली.

साउथ झोन मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच अवघ्या १५ धावांच्या अंतरात संघाने ४ महत्त्वाचे फलंदाज गमावले. तरीही एका बाजूने किल्ला लढवणारा तिलक वर्मा नाबाद १०६ धावांवर खेळत असून, कवुरी सैतेजा त्याला साथ देत आहे.

साउथ झोनच्या डावात श्रेयसने ८८ धावांची सुरेख खेळी केली, तर नारायण जगदीशनने ३६ आणि स्मरण रविचंद्रनने २७ धावांचे योगदान दिले. रिकी भुई (५) आणि तनय त्यागराजन (६) फार काळ टिकू शकले नाहीत, तर शेख रशीद, कोडिमेला हिमतेजा, विद्वथ कवेरप्पा आणि एमडी निधीश या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

नॉर्थ झोनच्या गोलंदाजीत गुरनूर ब्रारने ५९ धावांत ४ गडी बाद केले, तर अर्शदीप सिंग आणि अंशुल कम्बोज यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT