do not come in the next Test your career end Karthik's revelation
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासमोरच यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या समारोपाचा एक धक्कादायक किस्सा उघड केला आहे. ‘पुढील कसोटी सामन्यासाठी संघात येण्याची गरज नाही, तुझी कारकीर्द संपली आहे,’ असे शास्त्रींनीच आपल्याला सांगितल्याचा गौप्यस्फोट कार्तिकने केला. या अनपेक्षित खुलाशामुळे काही क्षणांसाठी गंभीर वातावरण निर्माण झाले आणि यामुळे क्षणभर रवी शास्त्रींनाही अवघडल्यासारखे झाले.
इंग्लंडमध्ये एका क्रीडा वाहिनीच्या पॉडकास्ट कार्यक्रमात रवी शास्त्री, इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन आणि मायकेल अथर्टन यांच्यासोबत दिनेश कार्तिक सहभागी झाला होता. यावेळी खेळाडूंच्या निवृत्तीवर चर्चा सुरू असताना कार्तिकने हा प्रसंग सांगितला, ज्यामुळे शास्त्री काहीसे अवघडल्याचे दिसून आले.
कार्तिक म्हणाला, माझ्यात आणि नासीरमध्ये फारसे साम्य नाही. नासीरने ‘लॉर्डस्’वर आपली कारकीर्द संपवली आणि मी सुद्धा. फरक इतकाच की, ते प्रशिक्षकाच्या दारावर गेले आणि म्हणाले, ‘मला वाटतं, माझं काम झालंय.’ माझ्या बाबतीत मात्र प्रशिक्षक स्वतः माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘पुढच्या कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस, तुझं काम झालंय’.
कार्तिकच्या या विधानानंतर कार्यक्रमात उपस्थित सर्वच जण खळखळून हसू लागले. बाजूलाच बसलेल्या रवी शास्त्री यांनीही हसत-हसत कार्तिकच्या पाठीवर थाप मारली आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी भारतीय संघाचा अविभाज्य भाग असलेल्या कार्तिकने अशाप्रकारे आपल्या कारकिर्दीचा शेवट झाल्याचे जाहीरपणे सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या घटनेमुळे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील संवादाच्या पद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दिनेश कार्तिकने 2018 मध्ये आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले होते. मात्र, इंग्लंड दौर्यातील त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. लॉर्डस्वरील दुसर्या कसोटीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. तोच सामना कार्तिकच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.
चर्चेची सुरुवात इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांच्या निवृत्तीच्या आठवणीने झाली. हुसेन यांनी सांगितले की, 2004 मध्ये लॉर्डस्वर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
स्वतःहून घेतलेला निर्णय : हुसेन म्हणाले, मला माहीत होतं की, माझी क ारकिर्दीतील वेळ संपली आहे. मी तत्कालीन प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘डंकन, उद्या माझा शेवटचा दिवस असेल.’ मला वाटलं होतं की, ते मला थांबवण्याचा प्रयत्न करतील; पण त्यांनीही माझ्या निर्णयाला दुजोरा दिला.
यशस्वी सांगता : पुढे हुसेन यांनी त्या सामन्याच्या दुसर्या डावात शतक झळकावले आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. एका यशस्वी खेळीने कारकिर्दीची सांगता केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
नासीर हुसेन यांचा किस्सा ऐकल्यानंतर दिनेश कार्तिकने आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट कसा झाला, हे सांगितले. त्याने हुसेन आणि आपल्या अनुभवातील फरक स्पष्ट केला.