Devdutt Padikkal BCCI x
स्पोर्ट्स

Devdutt Padikkal : द्रविड-पुजाराच्या क्लबमध्ये देवदत्त पडिक्कलची एंट्री; श्रीलंकेविरुद्ध रचला इतिहास

श्रीलंकाविरुद्धच्‍या कसोटी सामन्‍यात देवदत्त पडिक्कलने केला १५० धावांचा टप्‍पाही पार

पुढारी वृत्तसेवा

Devdutt Padikkal Maiden Test Century : गॉलच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले. पण तो एवढ्यावरच थांबला नाही; सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने १५० धावांचा टप्पाही पार केला.

पडिक्कलने केले संधीचे सोने

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपली छाप पाडली. दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलेल्या साई सुदर्शनच्या जागी पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ उशिरा सुरू

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही. अखेर तब्बल ४ तास ३० मिनिटांच्या विलंबाने खेळ सुरू झाला आणि त्यानंतर वेळेचे नवे नियोजन करण्यात आले.

पडिक्कलचे द्विशतक हुकले

पडिक्कलने पहिल्या दिवशी शतक ठोकले होते, जे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. दुसऱ्या दिवशीही त्याने आपली सुरेख फलंदाजी सुरू ठेवत १५० धावांचा टप्पा पार केला. यादरम्यान त्याने राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीशी बरोबरी साधली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५० हून अधिक धावा करणारा पडिक्कल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.मात्र, देवदत्त पडिक्कलच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. प्रभात जयसूर्याने त्याला बाद केले. पडिक्कलने २३० चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६७ धावांची दमदार खेळी केली.

गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी

याआधी पडिक्कलने भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या एका विक्रमाचीही बरोबरी केली होती. २१ व्या शतकात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा तो दुसरा डावखुरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी सौरव गांगुलीने २००२ मध्ये दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध १३६ धावांची खेळी करत हा पराक्रम केला होता.भारतासाठी ३ री वर फलंदाजी करताना कसोटी शतक ठोकणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांमध्ये विनोद कांबळी आघाडीवर असून त्यांच्या नावावर ४ शतके आहेत. सौरव गांगुली यांच्या नावावर ३ शतके आहेत. तर सलीम दुराणी, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, सुरिंदर अमरनाथ आणि आता देवदत्त पडिक्कल या सर्वांच्या नावावर प्रत्येकी १ शतक जमा आहे.

राहुल आणि पंतची साथ

पडिक्कलने ऋषभ पंतसोबत ११३ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर पहिल्या दिवशी 'रिटायर्ड हर्ट' होऊन ड्रेसिंग रूममध्ये परतलेल्या के. एल. राहुलसोबत त्याने भारतीय डाव पुढे नेला.पंतला चांगल्या सुवाताचा मोठा फायदा उठवता आला नाही आणि तो ६२ चेंडूंत ३९ धावा करून एका खराब फटक्यावर बाद झाला. के. एल. राहुलचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले; तो १७५ चेंडूंत ८२ धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिल (१६ धावा) स्वस्तात बाद झाला होता, तर यशस्वी जयस्वाल (३२ धावा) उत्तम सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र पावसामुळे वाहून गेले. सततच्या पावसामुळे दुसरे सत्रही उशिरा सुरू झाले आणि खेळपट्टीतील ओलसरपणाचा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पूर्ण फायदा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT