Gambhir to Continue as Head Coach: दक्षिण आफ्रिकेकडून घरच्या मैदानावर झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतरही गौतम गंभीरच्या पदाला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट संकेत BCCI कडून मिळत आहेत. बोर्डचे मत आहे की सध्या भारतीय संघ मोठ्या ट्रान्झिशनमधून जात आहे आणि अशा काळात घाईघाईने निर्णय घेणे योग्य नाही. ज्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला सातत्याने पाठिंबा दिला आहे, त्यांच्यावरच विश्वास ठेवण्याची BCCI ची भूमिका आहे.
गौतम गंभीर कोच झाल्यानंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन टेस्ट मालिकांमध्ये क्लीन स्वीप सहन करावा लागला.
एका वर्षात भारताचा घरच्या मैदानावर दोन वेळा सूपडा साफ होण्याची ही ऐतिहासिक घटना घडली आहे.
26 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरने पत्रकार परिषदेला हजेरी लावली. तेव्हा त्याच्या कोच पदावरील भवितव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. गंभीरने स्पष्ट केले की “कोच राहायचे की नाही, निर्णय बोर्डच घेईल”.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार एक अधिकारी म्हणाला, “BCCI कोणताही निर्णय घाईघाईत करणार नाही. संघ बदलाच्या टप्प्यातून जात आहे. वर्ल्ड कप जवळ आला आहे आणि गौतम गंभीर यांचा कॉन्ट्रॅक्ट 2027 वर्ल्ड कपपर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आताच कोणताही निर्णय होणार नाही. पुढे गरज भासल्यास निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटशी चर्चा केली जाईल.”
दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या 408 धावांच्या मोठ्या पराभवानंतर गंभीरने कोणत्याही एका खेळाडूला दोष न देता संपूर्ण टीमची जबाबदारी मान्य केली.
ता म्हणाला “त्यात माझ्यासह ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाची जबाबदारी आहे. टीम स्पोर्टमध्ये हार एकट्याची नसते. आपण सर्वांनी एकत्र जबाबदारी घ्यायला हवी.” त्याने पुढे भारतीय रेड बॉल क्रिकेटमधील कमतरता सांगितल्या, “रेड बॉल क्रिकेटमध्ये मानसिक, तांत्रिक, दबाव झेलण्याची क्षमता आणि संघासाठी त्याग करण्याची भावना, या सगळ्यावर खूप काम करावे लागेल.”
गंभीरने टेस्ट क्रिकेटला प्राधान्य देण्याची गरजही अधोरेखित केली, “व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये रन मिळाल्यावर लोक टेस्टमधील कामगिरी विसरतात. हे चुकीचे आहे. चाहत्यांपासून मीडियापर्यंत सर्वजण टेस्ट परफॉर्मन्सकडे दुर्लक्ष करतात.” भारतीय संघ आता 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका, त्यानंतर पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील टेस्ट सामना भारत ऑगस्टमध्ये खेळेल.