CSK match fixing controversy IPL 2025 : आयपीएलमधील 'चेन्नई सुपर किंग्स' (CSK) या संघावर पुन्हा एकदा 'फिक्सिंग' प्रकरणाचे सावट निर्माण झाले आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात सामन्यांपूर्वी 'प्लेइंग इलेव्हन'सह (अंतिम अकरा खेळाडूंची यादी) इतर महत्त्वाची माहिती बुकींना पुरवल्याचा आरोप या संघातील एका खेळाडूवर करण्यात आला आहे. एका 'स्टिंग ऑपरेशन'मधून ही बाब उघडकीस आली आहे. आयपीएल २०२५ मधील चेन्नईच्या पाच सामन्यांची माहिती बुकींना आगाऊ देण्यात आली होती; यासाठी संबंधित खेळाडूला प्रति सामना ६० लाख रुपये, म्हणजेच संपूर्ण हंगामात बुकींकडून एकूण ३ कोटी रुपये मिळाले होते, असा खळबळजनक दावा या 'स्टिंग ऑपरेशन'मधून करण्यात आला होता.
'तहलका'ने केलेल्या एका 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये रणजी ट्रॉफी खेळलेल्या एका माजी खेळाडूने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील 'प्लेइंग इलेव्हन'बद्दल अंतर्गत माहिती असल्याचा दावा केला होता. संबंधित प्रतिनिधीने बुकी असल्याचा बनाव करून CSK च्या एका खेळाडूशी संवाद साधला. यामध्ये स्पष्ट झाले की, CSK चा एक खेळाडू दिल्लीतील एका माजी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या खेळाडूला गोपनीय माहिती पुरवत होता. हा माजी खेळाडू ती माहिती लंडनमधील बुकींना विकत असे. २०२५ च्या हंगामातील एका सामन्यासाठी त्याने ६० लाख रुपयांच्या बदल्यात ही माहिती विकली होती. सहा प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या या खेळाडूने ही माहिती विकून ३ कोटी रुपये कमावले होते.
'तहलका'ने केलेल्या खुलाशात संबंधित CSK खेळाडूचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्या खेळाडूने असाही दावा केला होता की, त्याला माहिती देणारा खेळाडू लिलावात विकत घेतला गेला, तर तो २०२६ च्या आयपीएलमध्येही अशीच गोपनीय माहिती पुरवू शकेल. आयपीएल सामने फिक्स करण्यासाठी त्याने १ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि कामाची ९० टक्के खात्रीही दिली होती. मात्र, संबंधित खेळाडूची निवड झाली नाही.
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) स्पष्ट केले आहे की, 'मॅच-फिक्सिंग'शी फ्रँचायझीचे नाव जोडणाऱ्या वृत्तांची दखल त्यांचे बोर्ड घेईल. क्रिकेटमधील अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे फ्रँचायझीने स्पष्ट केले. आगामी काही दिवसांत CSK च्या बोर्डाची बैठक होणार असून यामध्ये या आरोपांवर चर्चा केली जाणार आहे.
"आमची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. त्याआधी आमच्या बोर्डाची बैठक होईल आणि आम्ही या विषयावर चर्चा करू," असे CSK च्या एका अधिकाऱ्याने 'क्रिकबझ'ला सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्यांनी आपली ओळख उघड न करण्याची विनंती केली. तसेच, आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती अद्याप पडताळलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
'स्टिंग ऑपरेशन'मध्ये असेही समोर आले की, 'दिल्ली प्रीमियर लीग' (DPL) मधील एका संघातील अंतर्गत माहिती देणाराही तो होता. विशेष म्हणजे, समोर आलेल्या वृत्तानुसार ही माहिती दिल्ली प्रीमियर लीगच्या अलीकडील हंगामातील ३ ऑगस्टच्या सामन्याशी तंतोतंत जुळणारी होती. मात्र, हे आरोप दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) फेटाळले आहेत. ही माहिती 'आधारहीन' असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तरीही त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडून सल्ला मागितल्याचे सांगितले.
दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) कथित 'फिक्सिंग' प्रस्तावाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) पत्र लिहिले आहे. "आम्ही BCCI च्या संपर्कात आहोत. भ्रष्ट प्रस्तावाबद्दल माहिती मिळताच आम्ही त्यांना त्या दिवशीच पत्र लिहिले," असे DDCA चे सचिव अशोक शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांनी तपशील दिला नसला तरी, या वर्षीच्या दिल्ली प्रीमियर लीगदरम्यान एका खेळाडूला असा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. त्या खेळाडूने याबद्दल DDCA आणि भ्रष्टाचार-विरोधी विभागाला (अँटी-करप्शन युनिट) माहिती दिली आहे.