टी 20 विश्‍वचषक स्‍पर्धेत लक्षवेधी कामगिरी केलेला टीम इंडियाचा स्‍टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्‍या आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.  Pudhari
स्पोर्ट्स

Jasprit Bumrah IPL 2026 |बुमराहच्या यॉर्करची ‘धार’ कुठे हरवली? वर्ल्ड कप गाजवल्यानंतर IPLमध्ये का ठरतोय हतबल?

Jasprit Bumrah IPL 2026 | बुमराहची अपेक्षित साथ न मिळाल्याने मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ

पुढारी वृत्तसेवा

Jasprit Bumrah IPL 2026 Struggles

मुंबई इंडियन्सच्या आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मारा हा दरवर्षी आयपीएलमध्ये चर्चेचा विषय. मात्र यंदा चित्र थोडं वेगळं आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत जसप्रीत बुमराहची कामगिरी लक्षवेधी ठरली. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत तरी त्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सलग पाच सामन्यांत एकही विकेट न मिळाल्यामुळे त्याच्यावरचा दबाव वाढला असून, याचा मोठा फटका मुंबई इंडियन्स संघालाबसत आहे. एरवी बुमराह आपल्या अचूक यॉर्कर्सने फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यासाठी किंवा स्लोअर बॉल्सने फलंदाजांना चकवण्यासाठी ओळखला जातो; मात्र या हंगामात त्याची ही जादू अद्याप पाहायला मिळालेली नाही. जाणून घेऊया यामागील कारण...

वर्ल्ड कपमधील दुखापतीमुळे दमछाक

आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात बुमराहने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनीही याकडे लक्ष वेधले आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर ते म्हणाले, "वर्ल्ड कपमधून येताना त्याला थोडी दुखापत (निगल) झाली होती. त्यामुळे गेल्या काही सामन्यांतून आम्ही त्याला पुन्हा लयीत आणण्याचा प्रयत्न करत होतो."

...मग मात्र त्याला थांबवणे कठीण होईल

तथापि, जयवर्धने यांनी बुमराहबद्दल फारशी चिंता व्यक्त केलेली नाही. "त्याचा वेग वाढला आहे, आम्ही सर्व गोष्टींची पाहणी केली असून तो आता पूर्णपणे सावरला आहे. एकदा का त्याने विकेट्स घ्यायला सुरुवात केली, की मग त्याला थांबवणे कठीण होईल," असा विश्वास व्यक्त करत आम्हाला फक्त त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य गोलंदाजांकडून मिळाली नाही भक्कम साथ

या कठीण काळातही बुमराह मुंबईचा सर्वात काटकसरी (इकोनॉमी ८.६३) गोलंदाज ठरला आहे. ही सरासरी त्याच्या कारकीर्दीतील सरासरीपेक्षा (७.२९) जास्त असली, तरी चिंतेची बाब म्हणजे इतर गोलंदाजांकडून त्याला मिळणारी साथ. मुंबईच्या ताफ्यातील इतर सर्व वेगवान गोलंदाज प्रति षटक १० हून अधिक धावा देत आहेत, विशेषतः पॉवरप्लेमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत सुमार ठरली आहे.

स्विंग मास्टर दीपक चहर पूर्णपणे निष्प्रभ

गुरुवारी झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात हे प्रकर्षाने जाणवले. जिथे अर्शदीप सिंग आपल्या स्विंगने फलंदाजांना नाचवत होता, तिथे मुंबईचा स्विंग मास्टर दीपक चहर पूर्णपणे निष्प्रभ ठरला. हार्दिक पांड्याची गोलंदाजीही वर्ल्ड कपमधील त्याच्या फॉर्मच्या तुलनेत फिकी वाटत आहे. ट्रेंट बोल्टची कामगिरीही इतकी खालावली की, परदेशी खेळाडूंच्या कोट्यात बदल करताना त्यालाच संघातून वगळावे लागले.

सामन्‍यात निर्णायक क्षणी पाचारण करणे गरजेचे

साधारणपणे, आयपीएल सामना हातातून निसटत असतो, तेव्हाच कर्णधार बुमराहकडे चेंडू सोपवत असल्याचे चित्र आहे. मागील सामन्यात सहाव्या षटकात अल्लाह गझनफरने दोन धक्के दिल्यानंतर बुमराहकडून अपेक्षा होती, किंवा १३व्या षटकात श्रेयस अय्यरला बाद करण्यासाठी जेव्हा त्याला आणले गेले, तेव्हा त्याने खेळावर पकड मिळवणे अपेक्षित होते. मात्र, घडले उलटच; अय्यरसमोर बुमराहचा मारा निष्फ्रभ ठरला. क्रिकेट विश्लेषकांच्या मते सामन्यात बुमराहला निर्णायक क्षणी पाचारण करणे गरजेचे आहे.

बुमराहच्या फिटनेसचे उत्तर मुंबई संघाकडेच

बुमराहला फिटनेसबाबत आता केवळ मुंबईचे व्यवस्थापनच सांगू शकेल; पण फॉर्म खराब असेल तर बुमराह अर्शदीप सिंगप्रमाणे कमबॅक करू शकतो. अर्शदीपने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर २२ धावा देत ३ बळी घेतले होते. तर याच वानखेडेवर बुमराहने तब्बल ४१ धावा दिल्या. आयपीएलच्या सामन्यांमुळे खेळाडूंना विश्रांती मिळणे ही तारेवरची कसरतच ठरते. आता बुमराहला अर्शदीपप्रमाणेच सरावादरम्यानच आपली लय पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याला लय सापडली तर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा झेप घेऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT