Boxing Day Tes Ashes 2025
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या चौथ्या सामन्यात गोलदाजांनी केलेल्या भेदक मार्यामुळे फलंदाजांची भंबेरी उडाली. दोन दिवसांमध्ये संपलेल्या सामना इंग्लंडने ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत कमबॅक केले आहे.
'बॉक्सिंग डे' कसोटी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा इंग्लंडच्या संघाने घेतला. वेगवान गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५२ धावांवर गुंडाळला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टोंग याने पहिल्या डावात पाच बळी घेत कांगारूंचे कंबरडे मोडले आणि विजयाचा पाया रचला. मात्र, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अधिक घातक मारा केला. मायकेल नेसर आणि स्कॉट बोलँड यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. पहिला डाव केवळ ११० धावांत आटोपला.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १३२ धावावर संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील ४२ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. हे आव्हान इंग्लंडने ६ गडी गमावून पूर्ण करत मालिकेत आपला पहिला विजय नोंदवला.
ॲशेसच्या इतिहासात १०० वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा कसोटी सामना दोन दिवसांत संपण्याची ही दुर्मिळ घटना घडली आहे. विशेष म्हणजे, २०२५-२६ च्या याच मालिकेतील पर्थ येथील पहिली कसोटी देखील दोनच दिवसांत संपली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. पर्थ कसोटीत ट्रेव्हिस हेडचे स्फोटक शतक आणि मार्नस लॅबुशेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच दिवशी विजय साकारला होता.
या दोन सामन्यांपूर्वी, शेवटचा असा निकाल १९२१ मध्ये नॉटिंगहॅम येथे लागला होता. ॲशेसच्या आतापर्यंतच्या इतिहासात केवळ सात वेळा कसोटी सामने दोन दिवसांत संपले आहेत. याची सुरुवात १८८८ मध्ये लॉर्ड्स मैदानावर झाली होती. त्यानंतर त्याच वर्षी ओव्हल आणि मँचेस्टर येथील सामनेही दोन दिवसांत संपले होते.
संपूर्ण इंग्लंड संघासाठी ऑस्ट्रेलियन भूमीवरील हा पहिला विजय असला तरी, बेन स्टोक्स आणि जो रूटसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवरील हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक दौऱ्यात पराभव किंवा अनिर्णित सामना राहिला होता.