Ben Stokes On Root Captaincy: इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद हॅरी ब्रुकला न मिळाल्यामुळं आश्चर्य व्यक्त केले आहे. हॅरी ब्रूक हा इंग्लंडचा टी २० आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. तसेच तो कसोटी संघाचा उपकर्णधार देखील आहे.
बेन स्टोक्सने जून २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर स्टोक्सने त्याच्या जागी ब्रूकला कर्णधार करण्यात यावं या मागणीचे समर्थन केले होते. तो दीर्घ काळापासून कसोटी संघाचा उपकर्णधार आहे.
मात्र निवडसमितीने स्टोक्सचा सल्ला ऐकला नाही अन् त्यांनी जो रूटच्या गळ्यात कसोटी कर्णधारपदाची माळ टाकली. जो रूट पहिल्यांदाच कर्णधार झालेला नाही. तो स्टोक्सला कर्णधारपद देण्यापूर्वी संघाचे नेतृत्व करत होता. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१७ ते २२ या काळात ६५ कसोटी सामने खेळले असून त्यातील २७ सामन्यात विजय मिळवला होता.
स्टोक्सने लव्ह ऑफ क्रिकेट या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, 'माझ्या मते जर तुम्हाला वाटत असेल की चांगला कर्णधार चांगला लीडर होईल तर त्याला जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडसमितीचा तर्क समजू शकतो. मात्र तरी देखील माझ्या मानत एक प्रश्न आहे की यामुळं ब्रूकला काय मेसेज जाणार आहे. तो संघाचा उपकर्णधार आहे. मात्र कर्णधार नाहीये तरी त्याला संघाची धुरा दिली जात नाहीये.'
नुकतेच इंग्लंडने न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगला कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक केलं आहे. फ्लेमिंगने ब्रँडन मॅक्युलमचे जागा घेतली. मॅक्युलम आता वनडे आणि टी २० संघाचा प्रशिक्षक असणार आहे. फ्लेमिंगने चेन्नईसाठी आयपीएलमध्ये रेकॉर्ड ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत. स्टोक्स देखील सीएसकेचा भाग राहिला आहे.
स्टोक्सने सांगितलं की, मी जो रूटच्या यशासाठी प्रार्थना करतो. मला आशा आहे की तो पुढं येऊन कर्णधार म्हणून मोठं यश मिळवले. मला वाटते की त्याला फ्लेमिंगसोबत काम करतना मजा येईल. तो एक चांगला व्यक्ती आहे. मी फ्लेमिंगसोबत काम केलं आहे.
मात्र रूटला मी सांगितलं की माझी एकच चिंता आहे. ती चिंता म्हणजे तू आहेस. मला माहिती आहे की तू कोणत्या परिस्थितीतून गेला आहेस. तू कायमच टीमला पुढे ठेवतोस. ज्यावेळी तो इंग्लंडचा कर्णधार होता त्यावेळी त्याला कठिण परिस्थितीतून जावं लागलं होतं. परत असं व्हावं असं मला वाटत नाही. मी त्याच्या मोठ्या यशाची कामना करतो. मला खात्री आहे की तो चांगली कामगिरी करेल.