BCCI IPL 2027 Schedule PUDHARI
स्पोर्ट्स

BCCI IPL 2027 Schedule: IPL मध्ये होणार मोठा बदल, पुढच्या हंगामासाठी बीसीसीआयचे वेगळेच प्लॅनिंग

Anirudha Sankpal

BCCI IPL 2027 Schedule Change: जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) बाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या वेळापत्रकात (Schedule) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर २०२७ मधील आयपीएलचा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्याऐवजी थेट १० मार्चच्या आसपास सुरू होऊ शकतो आणि १५ मे पर्यंत संपवला जाऊ शकतो.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना हे संकेत दिले आहेत. खेळाडू आणि प्रेक्षकांना देशातील भीषण उष्णता तसेच मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पावसापासून वाचवण्यासाठी बोर्ड आयपीएलचे कॅलेंडर बदलण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. विशेष म्हणजे, २०२७ मधील आयपीएल हा या लीगचा २० वा मोसम असेल आणि बीसीसीआय तो ऐतिहासिक व संस्मरणीय बनवण्याच्या तयारीत आहे.

बदलाचे मुख्य कारण: कडाक्याची उष्णता आणि पाऊस

गेल्या काही वर्षांत आयपीएल दरम्यान देशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये खेळाडूंना इतक्या कडक उन्हात खेळणे आव्हानात्मक ठरत आहे. अनेक परदेशी खेळाडूंना भारताच्या या हवामानाशी जुळवून घेणे कठीण जाते.

याशिवाय, मे महिन्याच्या उत्तरार्धात अनेक शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू होतो, ज्यामुळे प्ले-ऑफ आणि फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यांवर विस्कळीत होण्याचे संकट घोंघावत असते. बीसीसीआयला टूर्नामेंटचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पावसाने बाधित व्हावा असे वाटत नाही. म्हणूनच बीसीसीआयने आपल्या 'गेम्स डेव्हलपमेंट' विभागाला नवीन विंडोवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

सामन्यांची संख्या वाढणार का?

आयपीएलमधील सामन्यांची संख्या ७४ वरून थेट ९४ केली जाणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली होती. मात्र, बीसीसीआयने ही शक्यता तूर्तास फेटाळून लावली आहे. देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये आयपीएलसाठी दोन महिन्यांचा वेळ काढणे देखील खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत २० अतिरिक्त सामने जोडणे व्यावहारिक नाही. हा जगभरातील क्रिकेटपटूंचा प्लॅटफॉर्म असल्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांतील खेळाडूंची उपलब्धताही महत्त्वाची असते. त्यामुळे सध्या ७४ सामन्यांसहच स्पर्धा खेळवली जाईल.

देशांतर्गत क्रिकेटवर होणार परिणाम

आयपीएल लवकर सुरू करण्याच्या या योजनेचा थेट परिणाम भारताच्या देशांतर्गत (Domestic) क्रिकेट हंगामावर होऊ शकतो. रणजी ट्रॉफीसह सर्व प्रमुख देशांतर्गत स्पर्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यामुळे खेळाडूंना आयपीएलच्या तयारीसाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT