IPL 2026 Rules
आयपीएल २०२६ दरम्यान भ्रष्टाचाराविरोधी धोरणांची कडक अंमलबजावणी केल्यानंतर BCCI ने आता आणखी कठोर पावले उचलली आहेत. बोर्डाच्या या नवीन निर्णयामुळे खेळाडू, ब्रॉडकास्टर्स, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय आता कडक देखरेखीखाली असणार आहेत.
युझवेंद्र चहल विमानामध्ये 'व्हॅपिंग' (E-cigarette) करताना दिसल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, BCCI ने अर्शदीप सिंगला सोशल मीडियासाठी व्लॉगिंग थांबवण्यास सांगितल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली होती.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, BCCI किंवा कोणत्याही आयपीएल संघाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला मैदानावर व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असे करताना आढळल्यास त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते. पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सोशल मीडियासाठी व्लॉगिंग थांबवण्यास सांगण्यात आल्याची बातमी समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल २०२६ दरम्यान काही अधिकारी आणि ब्रॉडकास्टर्स खेळाडू आणि सामना अधिकारी यांच्या राखीव क्षेत्राजवळ (PMOA) व्हिडिओ बनवताना आढळले होते, ज्याबद्दल BCCI ने त्यांना आधीच समज दिली आहे. BCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही समालोचकांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सामन्याच्या तणावाच्या परिस्थितीत डगआऊटजवळ आपल्या फोनवर व्हिडिओ बनवताना आढळला. BCCI च्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याचे रेकॉर्डिंग थांबवले."
"स्वतःच्या युट्यूब चॅनेलसाठी चित्रीकरण करणाऱ्या एका माजी क्रिकेटपटूला कायदेशीर नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, BCCI किंवा IPL चा अधिकृत पोशाख परिधान केलेली कोणतीही व्यक्ती मैदानावर चित्रीकरण करताना दिसता कामा नये. आयपीएल संघ आणि खेळाडूंमध्ये वाढत्या "रील्स कल्चर" बद्दल BCCI चिंतेत आहे. खेळाडूंच्या जवळच्या कुटुंबियांना देखील आयपीएल दरम्यान व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.