बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी काही फ्रँचायझी आणि खेळाडूंच्या वर्तनात अनियमितता दिसून आल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.  Pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026 : खेळाडू आणि फ्रँचायझींना BCCI चा अल्टिमेटम; 'या' चुका केल्यास थेट होणार कारवाई!

BCCI IPL protocols | सर्व संघांना लवकरच नियमावली जारी होणार

पुढारी वृत्तसेवा

BCCI IPL protocols

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडू आणि फ्रँचायझींशी संबंधित प्रोटोकॉलच्या पालनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, काही फ्रँचायझी आणि खेळाडूंच्या वर्तनात अनियमितता दिसून आली आहे, ज्याकडे बोर्ड अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.

बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल नियमावली जारी करणार

सैकिया म्हणाले की, यंदाच्‍या हंगामात समोर आलेल्या "विसंगती आणि अनियमितता" रोखण्यासाठी बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल एक नियमावली जारी करणार आहेत. अनेक घटना बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यंदाच्‍या हंगामात अनेक अनियमितता

बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केले की, "यावेळी आम्हाला काही फ्रँचायझी आणि खेळाडूंच्या बाबतीत अनेक अनियमितता दिसून आल्या आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल एक नियमावली तयार करत आहे. अनधिकृत व्यक्ती टीम बसमधून खेळाडूंसोबत प्रवास करताना, तसेच काही व्यक्ती हॉटेलमध्ये आणि अगदी खेळाडूंच्या किंवा अधिकाऱ्यांच्या खोलीत विनापरवाना जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. हे आमच्या भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलच्या पूर्णपणे विरोधात आहे.

वादाची ठिणगी कुठून पडली?

गेल्या एप्रिल महिन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघ दोन वेगवेगळ्या कारणांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. गुवाहाटी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल टीम मॅनेजर रोमी भिंडर यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच कडक ताकीद देण्यात आली. त्यानंतर जाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थानचा खेळाडू रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये कथितरित्या 'वेपिंग' (ई-सिगारेट) करताना दिसला होता. सैकिया यांनी आयएनएसला (IANS) सांगितले की, "या घटना बीसीसीआयने अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. आता कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही."

कोणाचीही गय केली जाणार नाही

नवीन नियमावली जारी झाल्यानंतर जर कोणीही नियम मोडला, तर त्याच्यावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. मग तो खेळाडू असो, संघाचा अधिकारी असो किंवा मालक, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिला आहे.

स्पर्धेच्या कामकाजात पारदर्शकता आणणार

सध्या बोर्डाकडून कोणत्याही विशिष्ट फ्रँचायझी, खेळाडू किंवा व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. खेळाडूंची सुरक्षा, संघातील शिस्त आणि स्पर्धेच्या कामकाजात पारदर्शकता राखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT