आशिया चषकावरून BCCI ने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे.
ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी चषक लवकर भारताला देण्याची मागणी
आता पुढील तक्रार थेट ICC कडे करण्याचा इशारा
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसीन नक्वी यांना तत्काळ आशिया चषकाची ट्रॉफी विजेत्या भारताकडे सुपूर्द करावी, अशा आशयाचा अधिकृत ईमेल पाठवला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता, ज्यामुळे नक्वी यांनी ACC अधिकाऱ्यांना ती घेऊन जाण्यास सांगितले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट कौन्सिलचे प्रमुख मोहसीन नक्वी यांना आशिया चषक ट्रॉफी भारताकडे परत सोपवण्यासंबंधी एक औपचारिक ईमेल केला आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ‘इंडिया टुडे’ सोबत विशेष संवाद साधताना ही माहिती दिली. ते नक्वी यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहेत आणि जर त्यांच्याकडून काहीही उत्तर आले नाही, तर अधिकृत ईमेलद्वारे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) नेण्यात येईल. बीसीसीआय या प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने पुढे जात असून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही, सैकिया यांनी स्पष्ट केले.
३० सप्टेंबर रोजी झालेल्या एसीसी बैठकीदरम्यान, बीसीसीआयने नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध केला होता. तसेच हा आशिया चषक एसीसीचा असल्याचे स्पष्ट केले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यावर जोर देत म्हटले होते की, आशिया चषक २०२५ ची ट्रॉफी कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील विजयी भारतीय संघाला अधिकृतपणे प्रदान केली जावी आणि ती तातडीने आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) ताब्यात ठेवली पाहिजे.’ यापूर्वीही, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एसीसी अध्यक्षांच्या कृतीवर टीका केली होती आणि त्यास अयोग्य ठरवले होते.
‘आम्ही ACC अध्यक्षांकडून आशिया चषक २०२५ ची ट्रॉफी स्वीकारायची नाही, असा निर्णय घेतला होता, कारण ते पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. यामुळे नक्वी यांना ट्रॉफी आणि पदके सोबत घेऊन जाण्याचा अधिकार मिळत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि खेळाडूवृत्तीला काळीमा फासणारे कृत्य आहे. ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारताला परत मिळतील अशी आम्हाला आशा आहे,’ असे सैकिया यांनी नमूद केले.
एसीसी सदस्य मंडळांची माफी मागितल्यानंतरही नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी ट्रॉफी भारतीय संघाला परत करण्यास नकार दिला. ट्रॉफी हवी असल्यास, भारतीय कर्णधाराला ती घेण्यासाठी दुबईतील एसीसी मुख्यालयात स्वतः उपस्थित राहावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते.
बीसीसीआयने नक्वींची ही अट त्वरित फेटाळून लावली. अंतिम सामन्यांनंतर तत्काळ प्रदान करायच्या ट्रॉफीसाठी भारतीय कर्णधाराने दुबईला जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे चोख प्रत्युत्तर बीसीसीआयने दिले.