BCCI Action On Age Fraud pudhari
स्पोर्ट्स

BCCI Action On Age Fraud: ३ जन्म दाखले, ३ जन्मतारखा! टीम इंडियाच्या या खेळाडूवर बीसीसीआयने केली कारवाई २ वर्षाची घातली बंदी

Anirudha Sankpal

BCCI Action On Age Fraud: बीसीसीआयने वय चोरी प्रकरणी मोठी कारवाई केली असून बंगालच्या लेग स्पिनरवर दोन वर्षाची बंदी घातली आहे. रोहित यादव याच्या नावावर तीन वेगवेगळे जन्म दाखले मिळाले आहेत. यात २००७, २००९ आणि २०१० या वर्षाच्या जन्म दाखल्यांचा समावेश आहे. त्याच्या कागदपत्रात विसंगती आढळून आल्यामुळं त्याला एज ग्रुप क्रिकेट खेळण्यास अयोग्य मानलं गेलं आहे.

भारताच्या १९ वर्षाखाली संघात समावेश

रोहित नुकतेच भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा भाग राहिला आहे. त्याने जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात रोहित यादवची मोलाची भूमिका होती. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या १९ वर्षाखालील मालिकेसाठी देखील भारतीय संघात निवड झाली होती. ही मालिका राजकोटमध्ये या महिन्यापासून सुरू होणार आहे.

मात्र श्रीलंका दौऱ्यावेळी त्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीत मोठी गडबड समोर आली होती. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की वयाबाबतच्या कागदपत्रात गोंधळ आढळल्यामुळं त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

रोहित मुळचा उत्तर प्रदेशचा

रोहित हा मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून खेळतो. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये त्याने आपले जन्म साल हे २००७ नोंदवले आहे. मात्र आधार कार्डच्या रेकॉर्डवर त्याचे जन्म वर्ष वेगवेगळे आढळून आले आहे. २०१७ आणि २०२० मध्ये अपडेट केल्या गेलेल्या आधार रेकॉर्डमध्ये त्याचे जन्म वर्ष हे २००६ नोंदवले गेले. त्यानंतर २०२१ मध्ये ते बदलून २००९ करण्यात आलं.

हे प्रकरण त्यावेळी उजेडात आलं ज्यावेळी सीएबीने रोहितला आपल्या ज्युनिर टीममधून बाहेर काढलं. त्यानंतर याबाबत बीसीसीआयला माहिती देण्यात आली, आता बोर्डने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर त्याच्यावर २ वर्षाची बंदी घातली आहे. सर्व संबंधित राज्यांना याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे.

CAB ने ६२ खेळाडूंवर केली कारवाई

वय चोरी प्रकरणी कारवाई होणारा रोहित यादव एकमेव खेळाडू नाहीये. सीएबीने कागदपत्रांच्या आणि वयाच्या बाबतीतील विसंगती आढळल्यामुळे एकूण ६२ खेळाडूंवर कारवाई केली आहे. २०२६ - २७ आणि २०२७ - २८ च्या सीजनमध्ये त्यांना कोणतीही स्पर्धेसाठी नोंदणी किंवा ट्रान्सफरसाठी त्यांना अयोग्य घोषित करण्यात आले आहे.

या यादीत भारताकडून २०२२ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये खेळलेला वेगवान गोलंदाज रवि कुमार याचे देखील नाव सामील आहे. सीएबीच्या रेकॉर्डनुसार त्याच्या खऱ्या वयात ४५ महिन्यांचे अंतर आढळून आले आहे. तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल भट्टी देखील या यादीत असून त्याने तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. तर दोन ए लिस्ट सामने देखील खेळले आहेत.

सीएबीने वयासंदर्भातील कागदपत्रे तपासून या खेळाडूंची यादी आपल्या वेबसाईटवर टाकली आहे. या कारवाईनंतर बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटना आता ज्युनियर क्रिकेटमधील वय चोरीबाबत गंभीर असून कडक भूमिका घेत आहे हे दिसून येतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT