India vs New Zealand : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील वर्षी होणार्या भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतात दोन्ही संघ तीन सामन्यांची वन-डे तर आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत. मार्च २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जानेवारी २०२६ मध्ये दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना असेल.
२०२४ टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांन निवृत्ती स्वीकारली होती. आता हे दोघेही न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. न्यूझीलंडचा भारत दौरा ११ जानेवारी रोजी खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरू होईल. मालिका ३१ जानेवारी रोजी खेळवल्या जाणाऱ्या शेवटच्या टी२० सामन्याने संपेल. आगामी टी२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असेल. भारत आणि श्रीलंका फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये एकत्रितपणे टी२० विश्वचषक आयोजित करणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे यजमानपद वडोदराला मिळाले आहे. १५ वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच या मैदानावर पुरुषांचा क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. हा सामना नव्याने बांधलेल्या कोटाम्बी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर डिसेंबर २०२४ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन महिला वनडे सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, २०२५ च्या महिला प्रीमियर लीग (WPL) चे ६ सामने येथे आयोजित करण्यात आले होते. वडोदरानंतर गुजरातमधील राजकोटला दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. येथे १४ जानेवारी रोजी सामना खेळला जाईल. त्यानंतर वनडे मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये १८ जानेवारीला होणार आहे.
टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने नागपूर आणि रायपूर येथे अनुक्रमे २१ जानेवारी आणि २३ जानेवारी २०२६ रोजी होतील. तिसरा, चौथा आणि पाचवा टी-२० सामना गुवाहाटी (२५ जानेवारी), विशाखापट्टणम (२८ जानेवारी) आणि तिरुवनंतपुरम (३१ जानेवारी) येथे खेळला जाणार आहे.