स्पोर्ट्स

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथचे विक्रमी क्षेत्ररक्षण..! 'बॉक्सिंग डे' कसोटीत मोडला राहुल द्रविडचा विक्रम

Steve Smith record : इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅक क्रॉली आणि बेन स्टोक्स यांचे झेल टिपताच स्मिथने विक्रमाला गवसणी घातली

रणजित गायकवाड

aus vs eng boxing day test steve smith broken rahul dravid's record

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने क्षेत्ररक्षणात आपल्या चपळाईचे दर्शन घडवले आहे. या सामन्यादरम्यान स्मिथने टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा एक मोठा विक्रम मोडीत काढत जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.

राहुल द्रविडला टाकले मागे

इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅक क्रॉली आणि बेन स्टोक्स यांचे झेल टिपताच स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी हे स्थान राहुल द्रविडच्या नावे होते, मात्र आता द्रविड तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. स्मिथच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २१२ झेलची नोंद झाली आहे, तर राहुल द्रविड यांनी त्यांच्या कारकिर्दीत २१० झेल घेतले होते. या यादीत इंग्लंडचा जो रूट २१४ झेलांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.

दोन्ही संघांच्या फलंदाजांची दैना

या सामन्यात पहिल्या डावात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. यजमान ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात अवघ्या १५२ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियासाठी मायकल नेसरने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली, तर उस्मान ख्वाजाने २९ धावांचे योगदान दिले. ॲलेक्स कॅरी (२०) आणि कॅमेरून ग्रीन (१७) यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. इंग्लंडच्या जोश टंगने भेदक मारा करत ५ बळी टिपले.

इंग्लंडचा डाव ११० धावांत संपुष्टात

प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची अवस्था तर त्याहूनही दयनीय झाली. संपूर्ण संघ केवळ ११० धावांत तंबूत परतला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने झुंजार ४१ धावा केल्या, तर गस ॲटकिन्सनने २८ धावांची भर घातली. कर्णधार बेन स्टोक्स अवघ्या १६ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. मायकल नेसरने ४, स्कॉट बोलँडने ३, मिचेल स्टार्कने २ आणि कॅमेरून ग्रीनने १ बळी मिळवत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT