स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 | ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघात दोन मोठे बदल, नवा संघ जाहीर

अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा डावलले

पुढारी वृत्तसेवा

ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक बाब म्हणजे जोश हेझलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस या तिघांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.

Australia T20 World Cup 2026 squad

मेलबर्न : येत्या ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या 'टी-२० विश्वचषक २०२६' साठी ऑस्ट्रेलियाने आपला अंतिम १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मात्र, स्पर्धेपूर्वीच कांगारूंना मोठा धक्का बसला असून, स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुसरीकडे, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे.

संघात दोन मोठे बदल

ऑस्ट्रेलियन निवड समितीने जाहीर केलेल्या अंतिम संघात एकूण दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या पॅट कमिन्सच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज बेन ड्वार्शियस याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्टला डच्चू देऊन त्याच्या जागी मॅथ्यू रेनशॉला संघात स्थान दिले आहे. 'बिग बॅश'मध्ये चमकदार कामगिरी करूनही स्टीव्ह स्मिथला विश्वचषकाचे तिकीट मिळालेले नाही.

दुखापतग्रस्त तिघा खेळाडूंचे पुनरागमन

ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक बाब म्हणजे जोश हेझलवूड, टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस या तिघांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. हेझलवूड हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ॲशेस मालिकेपासून मैदानाबाहेर होता, तर टिम डेव्हिड आणि नॅथन एलिस यांनीही दुखापतीमुळे अलीकडच्या अनेक मालिका गमावल्या होत्या.

पॅट कमिन्सला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळ हवा

निवड समितीचे सदस्य टोनी डोडमाइड यांनी बदलांचे समर्थन करताना सांगितले की, "पॅट कमिन्सला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. बेन ड्वार्शियस हा एक उत्तम पर्याय असून तो वेगवान गोलंदाजीसोबतच खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण करू शकतो. तसेच, श्रीलंकेतील फिरकीला पोषक खेळपट्ट्या लक्षात घेता मॅथ्यू रेनशॉ मधल्या फळीत संघाला मजबूती देईल."

ऑस्ट्रेलियाचा अंतिम टी-२० विश्वचषक संघ : मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शियस, कॅमेरून ग्रीन, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुह्नमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ, मार्कस स्टोइनिस, ॲडम झम्पा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT