

T20 World Cup 2026: T20 वर्ल्ड कप 2026 अजून सुरूही झालेला नाही, पण या स्पर्धेतील अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. जर पाकिस्तानने वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर बांग्लादेशला पुन्हा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यासाठी आधीच ‘प्लॅन-बी’ तयार ठेवला आहे. पाकिस्तान बाहेर पडल्यास, त्याच्या जागी बांग्लादेशला ग्रुप ए मध्ये घेण्याचा विचार सुरू आहे.
पाकिस्तान वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अंतिम निर्णय जाहीर झालेला नसून, बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी सरकारशी चर्चा सुरू असल्याचं संकेत दिले आहेत. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर काही दिवसांत निर्णय होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. या अनिश्चिततेमुळे आयसीसीवरही दबाव वाढला आहे. स्पर्धेचं वेळापत्रक, प्रसारण हक्क आणि व्यावसायिक गणित बिघडू नये, यासाठी आयसीसी कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही.
याआधी भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यामुळे बांग्लादेशला स्पर्धेबाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती बदलू शकते.
पाकिस्तान बाहेर पडल्यास, बांग्लादेशला पुन्हा वर्ल्ड कपमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या वेळी बांग्लादेशला आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळण्याची मुभा दिली जाईल. ही बांग्लादेशची जुनी मागणी होती आणि त्यामुळे तोडगा काढल्याचा निरोप आयसीसी देऊ शकते.
या संपूर्ण वादात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. 15 फेब्रुवारी रोजी होणारा हा सामना वर्ल्ड कपमधील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि कमाई करणारा सामना मानला जातो.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानसमोर एक पर्याय असा देखील आहे की, तो म्हणजे संपूर्ण स्पर्धेत सहभागी न होता, केवळ भारताविरुद्धचा सामना खेळायचा नाही, असं झाल्यास स्पर्धेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जर पाकिस्तान खेळला, तर त्याचे सामने पुढीलप्रमाणे आहेत –
7 फेब्रुवारी : नेदरलँड्सविरुद्ध
10 फेब्रुवारी : अमेरिकेविरुद्ध
15 फेब्रुवारी : भारताविरुद्ध
18 फेब्रुवारी : नामीबियाविरुद्ध
सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष पाकिस्तानच्या अंतिम निर्णयाकडे लागलं आहे. पाकिस्तानने माघार घेतली, तर बांग्लादेशची वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात आहे.
T20 वर्ल्ड कप 2026 फक्त मैदानावरच नाही, तर पडद्यामागेही तितकाच थरारक असणार आहे.