स्पोर्ट्स

AUS vs SA ODI : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज विजय! द. आफ्रिकेचा 276 धावांनी लाजिरवाणा पराभव

ग्रीन-हेड-मार्श यांचा शतकी झंझावात, 431 धावांचा डोंगर रचत द. आफ्रिकेला 155 धावांत गुंडाळले

रणजित गायकवाड

aus vs sa odi series australia big win south africa 276 run defeat

मकाय : मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील निराशाजनक फलंदाजीला मागे सारत ऑस्ट्रेलियाने क्वीन्सलँडच्या मैदानावर द. आफ्रिकेविरुद्ध 276 धावांनी विजय मिळवत असताना अनेक विक्रमांची आतषबाजी केली.

सलामीवीर ट्रॅव्हिस हेड, कर्णधार मिचेल मार्श आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन या तिघांनी झळकावलेल्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 431 धावांचा डोंगर उभारला तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 155 धावांमध्येच खुर्दा झाला.

ग्रीनने झळकावलेले 47 चेंडूंतील पहिलेवहिले शतक हे ऑस्ट्रेलियन फलंदाजातर्फे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. एकाच डावात पहिल्या तीन फलंदाजांनी शतके झळकावण्याचा पराक्रम वन डे क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी केवळ एकदाच घडला होता.

ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या 431 धावांच्या डोंगराखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ दडपला गेला आणि कूपर कॉनोलीच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 276 धावांनी मोठा विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या विजयाचा पाया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणार्‍या कर्णधार मिचेल मार्शने रचला. हेड आणि मार्श यांनी केवळ 34.1 षटकांत 250 धावांची सलामीची भागीदारी रचली. ही ऑस्ट्रेलियासाठी चौथी सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली.

हेड या भागीदारीत अधिक आक्रमक होता. त्याने केवळ 103 चेंडूंत पाच षटकारांसह 142 धावांची तुफानी खेळी केली. मार्शने आपले शतक पूर्ण करण्यासाठी 106 चेंडू घेतले. हेड बाद झाल्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर बढती मिळालेल्या ग्रीनने 55 चेंडूंत सहा चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 118 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रत्युत्तरात विजयाच्या आसपासही फिरकू शकला नाही. फिरकीपटू कूपर कॉनोलीने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. त्याने प्रथम डी झॉर्झीला बाद केले आणि त्यानंतर खालच्या फळीला गुंडाळत पाच बळी मिळवले. ही एका ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजातर्फे वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

संक्षिप्त धावफलक :

  • ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 2 बाद 431 (ट्रॅव्हिस हेड 142, कॅमेरून ग्रीन 118*, मिचेल मार्श 100; केशव महाराज 1/57)

  • दक्षिण आफ्रिका : 24.5 षटकांत सर्वबाद 155 (डेवाल्ड ब्रेव्हिस 49; कूपर कॉनोली 5/22, शॉन बट 2/29)

हा खेळ आकड्यांचा!

  • 276 : दक्षिण आफ्रिकेसाठी वन डे क्रिकेटमध्ये धावांच्या निकषावर हा सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्वी 2023 विश्वचषकात भारताने द. आफ्रिकेला 243 धावांनी चीत केले होते. हा त्यांचा यापूर्वीचा सर्वात मोठा पराभव होता.

  • 431 : 2 बाद 431 ही ऑस्ट्रेलियाची वन डे क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2006 मध्ये जोहान्सबर्ग लढतीत ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच 4 बाद 434 धावांचा डोंगर रचला होता.

  • 3 : हेड 142, मार्श 100 व ग्रीन नाबाद 118 या पहिल्या तीनही फलंदाजांनी शतके झळकावली. वन डे क्रिकेटमध्ये असा हा केवळ दुसरा पराक्रम ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमध्ये 2015 मध्ये अशी कामगिरी केली होती.

  • 250 : हेड व मार्श यांची सलामी भागीदारी वन डेत ऑस्ट्रेलियातर्फे पाचवी सर्वोच्च भागीदारी ठरली. यापूर्वी कोणत्याही क्रमांकासाठी द्विशतकी भागीदारीचा मागील विक्रम मॅक्सवेल व कमिन्स यांनी 2023 मध्ये मुंबईत आठव्या गड्यासाठी नोंदवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT