स्पोर्ट्स

Asia Cup : कोण ठरू शकेल आशिया चषकातील ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडू?

Asia Cup : प्रत्येक संघात असा एक ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडू आहे, जो आपल्या कामगिरीने सामन्याचा निकाल बदलू शकतो.

रणजित गायकवाड

दुबई : आशिया चषकातील रोमांच एव्हाना सुरू झाला असून, यंदा प्रथमच आठ संघ टी-20 फॉरमॅटमध्ये या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. संघांना प्रत्येकी चारच्या दोन गटांत विभागले असून, दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ सुपर फोरमध्ये दाखल होणार आहेत. सर्व संघांनी आपापले संघ जाहीर केले असून, प्रत्येक संघात असा एक ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडू आहे, जो आपल्या कामगिरीने सामन्याचा निकाल बदलू शकतो. अशाच काही निवडक खेळाडूंवर द़ृष्टिक्षेप...

अफगाणिस्तान - राशीद खान

अफगाणिस्तानचा कर्णधार आणि स्टार फिरकीपटू राशीद खान संघासाठी सर्वात मोठा ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो. यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला नसला (15 सामन्यांत 9 बळी) तरी, त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. नुकतेच, त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 170 बळींचा टप्पा गाठत सर्वाधिक बळी घेण्याचा जागतिक विक्रम नावावर केला आहे. कर्णधार म्हणून मधल्या षटकांमध्ये बळी मिळवण्याची त्याची क्षमता महत्त्वपूर्ण आहे, तर तळाच्या क्रमवारीत त्याची उपयुक्त फलंदाजी लक्षवेधी ठरू शकते. अफगाणला पहिल्यावहिल्या आशिया चषक जेतेपदाचे स्वप्न साकारायचे असेल, तर राशीदचा फॉर्म आणि नेतृत्व निर्णायक ठरेल.

श्रीलंका - पथुम निसांका

सलामीवीर पथुम निसांका आगामी आशिया चषकात लंकन संघासाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो. 27 वर्षीय निसांका सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने नुकतेच संघाला झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका जिंकून दिली. त्याने 68 टी-20 सामन्यांत 30.46 च्या सरासरीने आणि 123.10च्या स्ट्राईक रेटने 1,950 धावा केल्या आहेत, ज्यात 15 अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात त्याने 7 सामन्यांत 147 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 230 धावा केल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये मोठी फटकेबाजी करण्याची आणि मधल्या षटकांत फिरकी गोलंदाजांना प्रभावीपणे खेळण्याची त्याची क्षमता त्याला एक परिपूर्ण फलंदाज बनवते. श्रीलंकेला दमदार सुरुवातीसाठी त्याच्यावर अवलंबून राहावे लागेल.

बांगला देश - मुस्तफिजूर रहमान

वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान बांगला देशसाठी गोलंदाजीत सर्वात मोठी आशा आहे. अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज महत्त्वपूर्ण क्षणी, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये, चमकदार कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याने 113 टी-20 सामन्यांत 20.84 च्या सरासरीने आणि 7.30च्या इकोनॉमी रेटने 142 बळी घेतले आहेत. बांगला देशसाठी तो एक घातक शस्त्र ठरू शकतो. निर्णायक क्षणी बळी मिळवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो संघासाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरतो. जर त्याला सर्वोत्तम सूर सापडला, तर बांगला देशच्या आशिया चषक मोहिमेला मोठी चालना मिळू शकेल.

पाकिस्तान - सईम अयुब

23 वर्षीय सईम अयुब पाकिस्तानच्या सर्वात लक्षवेधी युवा फलंदाजांपैकी एक आहे. हा डावखुरा फलंदाज नेहमीच सातत्यपूर्ण योगदान देत नसला, तरी फॉर्ममध्ये असताना एकहाती सामना जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. 136 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने तो सलामीला आक्रमक फलंदाजी करतो. त्याने 41 टी-20 सामन्यांत चार अर्धशतकांसह 816 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार असूनही, त्याने यूएईविरुद्ध शारजाहमध्ये 69 धावांची खेळी केली. तो पाकिस्तानसाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो.

भारत - वरुण चक्रवर्ती

रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती भारतासाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो. तसे पाहता 2021 च्या टी-20 विश्वचषकात यूएईमध्ये तीन सामन्यांत त्याला एकही बळी घेता आला नव्हता. त्यानंतर त्याची कामगिरी खालावली होती; पण त्याने दमदार पुनरागमन केले. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या गोलंदाजीतील वैविध्य प्रतिस्पर्धी फलंदाजांना गोंधळात पाडते. संघात शुभमन, बुमराह, पंड्यासारखे धुरंधर असताना हा गूढ फिरकीपटू एक्स फॅक्टर खेळाडू ठरू शकतो, याचे कारण म्हणजे यूएईतील संथगती गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्या!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT