स्पोर्ट्स

Asia Cup 2025 : ‘आशिया चषक’साठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी युवा खेळाडूंमध्ये चुरस, गिल-जैस्वाल-साई सुदर्शनची आघाडी

९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

रणजित गायकवाड

ठळक मुद्दे

  • 6 महिन्यांवर आलेल्या टी-२० विश्वचषकापूर्वीची महत्त्वाची रणनीती

  • आशिया चषकानंतर लगेचच वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका

  • १७ सदस्यीय संघ निवडण्याची परवानगी

  • निवड समितीला विविध खेळाडूंच्या संयोजनांची चाचपणी करण्याचा पर्याय खुला

येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी युवा खेळाडूंमध्ये चुरस निर्माण झाली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि उदयोन्मुख स्टार साई सुदर्शन हे या स्पर्धेत आघाडीवर असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. संघाची घोषणा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळायची असली तरी, हे तिन्ही खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहेत. व्यस्त वेळापत्रकामुळे गिल आणि जैस्वाल यांनी मागील काही टी-२० मालिकांमध्ये विश्रांती घेतली होती, परंतु इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर ते निवडीसाठी उपलब्ध असतील, असे मानले जात आहे.

गिल, सुदर्शन आणि जैस्वाल यांच्या नावावर गंभीर विचार

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, निवड समितीने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल आणि त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात, म्हणजेच २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू होईल. या पार्श्वभूमीवर, जैस्वाल (आयपीएल २०२५ मध्ये ५५९ धावा, १६० स्ट्राइक रेट), गिल (६५० धावा, १५५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेट) आणि ऑरेंज कॅप विजेता साई सुदर्शन (७५९ धावा, १५६ स्ट्राइक रेट) यांच्या नावाचा गांभीर्याने विचार होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सध्या भारतीय संघाला पाच आठवड्यांची विश्रांती मिळाली आहे. या काळात क्रिकेट नसल्याने, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही या तिन्ही युवा खेळाडूंना टी-२० संघात संधी मिळायला हवी,’ अशी चर्चा आहे. २१ दिवस चालणाऱ्या या आशिया चषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठल्यास संघाला एकूण ६ सामने खेळावे लागतील, त्यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त ताण येणार नाही. शिवाय, १७ सदस्यीय संघ निवडण्याची परवानगी असल्याने निवड समिती विविध पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करत आहे. युएईमधील खेळपट्ट्या आणि सहा महिन्यांवर येऊन ठेपलेला टी-२० विश्वचषक लक्षात घेता, जैस्वाल, गिल आणि सुदर्शन यांना आघाडीच्या फळीत आजमावणे हा एक योग्य निर्णय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

२०२३ च्या अखेरीस भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा साई सुदर्शन सध्या टी-२० प्रकारात उत्कृष्ट लयीत आहे. त्याच वेळी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या प्रमुख गोलंदाजांची उपलब्धता देखील महत्त्वपूर्ण ठरेल. या दोन्ही खेळाडूंना आशिया चषक स्पर्धेनंतर लगेचच कसोटी मालिका खेळायची असल्याने, त्यांच्या कार्यभाराचे व्यवस्थापन करणे हे संघ व्यवस्थापनापुढील एक मोठे आव्हान असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT