पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. या दौऱ्यात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीव्यतिरिक्त मैदानाबाहेरही अनेक गोष्टी घडल्या. ज्या चर्चेचा विषय होत्या. गाबा कसोटीनंतर संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विनने (R Ashwin) अचानक निवृत्तीची घोषणा केली. तो मालिका मध्येच सोडून मायदेशी परतला. त्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. या काळात अश्विन, रोहित आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याला शेवटची कसोटी खेळू न देण्याबाबत अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता अश्विनने स्वतः या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे.
अश्विनने त्याच्या 'ऐश की बात' या यूट्यूब चॅनलवर निवृत्तीबद्दल बोलले आहे. त्याने त्याच्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे. अश्विनच्या मते, त्याची खेळामधील सर्जनशीलता संपली होती. त्याला वाटू लागले की, त्याचे काम संपले आहे. म्हणून, त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. असे त्याने युट्यूबवर बोलताना सांगितले आहे. पुढे अश्विन म्हणाला, 'आयुष्यात पुढे काय करायचे याचा मी खूप विचार करतो. जर एखाद्याला आपले काम पूर्ण झाले असे वाटू लागले. एकदा असे विचार येऊ लागले की मग दुसरे काहीही विचार करण्यात अर्थ नाही. मी काहीही सर्जनशील करण्याचा विचारही करू शकत नव्हतो. म्हणूनच मी निवृत्तीचा निर्णय घेतला.
अश्विनने त्याच्या निवृत्तीनंतर झालेल्या गोंधळाला आणि फेअरवेल न मिळाल्याबद्दल चाहत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिले. अश्विन म्हणाला की 'लोकांनी खूप काही सांगितले पण ती इतकी मोठी गोष्ट नव्हती. तुम्हाला काय वाटलं? मी पहिला सामना खेळलो नाही, मी दुसरा सामना खेळलो. मग मी तिसऱ्या सामन्यात बाद झालो आणि कदाचित पुढच्या सामन्यात खेळलो असतो. जर मला फेअरवेल टेस्ट मिळाली नाही तर काय फरक पडेल? कल्पना करा की मी संघात स्थान मिळवण्यास पात्र नाही पण मला फक्त निरोपासाठी संघात ठेवण्यात आले आहे. मी खेळायला खाली येतो आणि लोक टाळ्या वाजवत असतात. मला हे आवडत नाही आणि मला हे सर्व नकोही आहे.