असा ‘अश्विन’ होणे नाही!

R Ashwin आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
R Ashwin Retirement
रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.Pudhari File Photo
Published on
Updated on
विवेक कुलकर्णी

अवघ्या सात-आठ पावलांचा छोटासा रनअप, नजरेत कमालीचे तेज, प्रतिस्पर्ध्याच्या नजरेला नजर भिडवण्याची धमक आणि सर्वात महत्त्वाचे धावा वाचवण्यासाठी नव्हे, तर समोरील फलंदाजाला बाद करण्यासाठी हरसंभव, हरघडी प्रयत्नशील गोलंदाज म्हणजे तामिळनाडूचा अर्थातच आर. अश्विन. ताडमाड उंचीचा हा धिप्पाड गोलंदाज असा अचानक निवृत्ती स्वीकारत मुख्य प्रवाहातून बाहेर जाईल, असे वाटलेही नव्हते; पण कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही असा निर्णय घेता येतो, तोच खरा महान खेळाडू. अश्विन अशा महान खेळाडूंच्या मांदियाळीत अगदी मानाने डेरेदाखल झाला आहे...

अश्विन निवृत्त झाला, त्यावेळची काही छायाचित्रे आताही नजरेसमोरून हटत नाहीहेत. निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी काही तासांआधी ड्रेसिंग रूममध्ये विस्तृत संवाद साधणारा अश्विन, कर्णधार रोहित समोर आल्यानंतर त्याला आलिंगन देणारा अश्विन, प्रदीर्घ कारकिर्दीनंतर भविष्यासाठी शुभेच्छा देणार्‍या गंभीरचे अभिवादन स्वीकारणारा अश्विन... आणि निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही क्षणातच मुख्य प्रवाहातून अगदी सहजतेने बाहेर होणारा अश्विन... किती तरी रूपे..! ड्रेसिंग रूममध्ये अश्विनच्या निवृत्तीप्रीत्यर्थ केक आणत छोटासा सोहळा घडवून आणला गेला आणि अश्विनने आपल्या भावना व्यक्त करत असताना सर्व सहकार्‍यांची भावमुद्रा एकच सांगत होती, आपल्या फिरकीने भल्याभल्यांना जेरीस आणणारा हा लिजेंड पुन्हा आपल्या ड्रेसिंग रूममध्ये आपला सहकारी म्हणून दिसणार नाही!

मुळातच, ही अश्विनची निवृत्तीची वेळ नव्हती. एखाद्या मालिकेच्या मधोमध तर अजिबात नव्हती; पण नेहमी सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या, आपला स्वाभिमान जपणार्‍या अश्विनने आपण कुठे थांबावे, हे कदाचित वेळीच ताडले होते. आपण निवृत्त होत आहोत, हे त्याने आपल्या मनावर कदाचित पुरेपूर बिंबवले होते. म्हणूनच तो निवृत्तीचा निर्णय घेताना खंबीर होता. असेच मनोधैर्य, असाच मनाचा खंबीरपणा काही वर्षांपूर्वी धोनी, कुंबळे यांनीही दाखवला होता! अश्विनने जणू आपणही त्याच परंपरेचे पाईक असल्याचे सोदाहरण अधोरेखित केले! काही खेळाडू असे असतात, ज्यांचे मोठेपण त्यांच्या मैदानावरील कामगिरीत, त्यांच्या मदुर्मकीत, त्यांच्या पराक्रमात दडलेले असते. अश्विन हा त्यापैकीच एक. भारतातर्फे दुसर्‍या क्रमांकाचे 765 बळी, कसोटीत 537 बळी, मायदेशात 475 बळी, 300 पेक्षा अधिक पायचित व त्रिफळाचित, कसोटीत 37 वेळा डावात पाच बळी, कसोटी इतिहासात 11 वेळा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी, एकाच कसोटीत पाच बळी व शतक झळकावण्याचा चारवेळा पराक्रम, फक्त त्रिफळाचित करत टिपलेले 109 बळी, ही सारी आकडेवारी त्याचे मोठेपणच अधोरेखित करणारी; पण इतके असूनही ज्या मानसन्मानाचा तो मानकरी होता, तो मानसन्मान त्याच्या वाट्याला आला का, असा प्रश्न विचारला तर दुर्दैवाने त्याचे उत्तर नकारार्थी येते.

एक विसरून चालणार नाही की, अश्विन सर्वात जलद 250, 300, 350 कसोटी बळी घेणारा अव्वल गोलंदाज; पण तरीही त्याला नेहमी अंतिम एकादशमध्ये स्थान मिळवण्यासाठीच झगडावे लागले. काही काही वेळा तर अगदी नाणेफेकीची वेळ उंबरठ्यावर येऊन ठेपेपर्यंतही आपण संघात असू की नसू, यावरून तो तळ्यात-मळ्यात असायचा; पण या जिद्दी खेळाडूने, लढवय्या वीराने कधी जिगर हरली नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा एक व्यावसायिक गुण त्याच्या नसानसात भिनलेला होता, तो म्हणजे तो अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्वेषाने लढायचा. वेळेची नजाकत ओळखावी ती अश्विननेच. पाकिस्तानविरुद्ध 2022 टी-20 विश्वचषक अक्षरश: पणाला लागलेला असताना अश्विनने जी समयसूचकता दाखवली होती, त्याला तोड नाही. मोहम्मद नवाज गोलंदाजीला असताना त्याचा वाईड जाणारा चेंडू अश्विनने वेळीच ताडला होता. तो त्याने सोडून देण्याची धमक दाखवली. त्याचा अंदाज खरा ठरला आणि त्यानंतर पुढील चेंडूवर अश्विनने किंचित पुढे सरसावत गोलंदाजावरून चेंडू फटकावत जो विजय खेचून आणला, ते द़ृश्य दर्दी क्रिकेट रसिकांच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही.

इतके असूनही भारतीय संघव्यवस्थापनाची मेहेरनजर लाभणे दूरच, जो किमान मानसन्मान वाट्याला यायला हवा, तोही अश्विनच्या वाट्याला आला नाही. हाच अश्विन जर दुसर्‍या एखाद्या देशातील असता, तर मात्र त्याचे अंतिम एकादशमधील स्थान निश्चितपेक्षाही निश्चित असते. केवळ इथे होता म्हणूनच त्याच्या गळ्यात धोंडा आणि डोक्यावर टांगती तलवार ठरलेलीच होती. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने प्रत्येक कसोटी सामन्यात 5 च्या सरासरीने विकेटस् घेतल्या. सरासरीची ही आकडेवारी अगदी कुंबळेच (132 कसोटींत 619 बळी) नव्हे, तर वॉर्नपेक्षाही (145 कसोटींत 708 बळी) सरस आहे. याबाबतीत केवळ मुथय्या मुरलीधरनच कुंबळेपेक्षा सरस भरतो. कसोटी क्रिकेट चक्क 1877 पासून खेळवले जाते आहे; पण तरीही सर्वात जलद 250, 300, 350 कसोटी बळी आहेत, ते अश्विनच्याच खात्यावर. चेंडूमागे मिळणारे विकेटस् असा निकष लावला, तर त्यातही भारी ठरतो तो अश्विनच... तेही एकमेवाद्वितीय मुरली, वॉर्न, कुंबळे व मॅकग्रा असे दिग्गज खांद्याला खांदा लावून लढत असताना. अश्विन यात कधीही मागे पडला नाही; पण तरीही झगडणे हे त्याच्या कदाचित तळहातांच्या रेषांमध्येच जणू भिनलेले होते!

या सर्व कालावधीत, प्रवाहाखालून बरेच पाणी वाहून जात असताना अश्विनने मिळवलेही खूप. चेन्नईतील 9 कोटींचा आलिशान बंगला, रियल इस्टेटमधील 26 कोटींची गुंतवणूक, रोल्स रॉईससारख्या 6 कोटींच्या आलिशान कारचा ताफा, 93 लाखांची ऑडी, एकापेक्षा एक कंपन्यांचे गलेलठ्ठ करार, स्वत:चे यूट्यूब चॅनल, हे सारे त्याच्या दिमतीला; पण याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे अश्विनने मिळवलेला विश्वास... त्याने स्वत:ला सिद्ध करताना, कित्येकदा खणखणीत वाजवून दाखवलेले नाणे... आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहण्याचा त्याचा लढाऊ बाणा! अश्विनचा आणखी एक मोठेपणा म्हणजे सारी शिरस्तेशाही विरोधात असताना, प्रतिकूल असतानादेखील त्याने कधीही याबद्दल अगदी चकार शब्दही काढला नाही; पण त्याने निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर 24 तासांच्या आतच त्याच्या वडिलांचे जे विधान आले, ते त्याला इतकी वर्षे जी वर्तणूक मिळाली, त्याचेच प्रत्यंतर देणारी ठरली. त्याचे वडील ओघातच बोलून गेले, ‘माझ्या मुलाला पूर्ण कारकिर्दीत सातत्याने अवमानास्पद, अपमानास्पद वागणूक मिळाली, त्याचे आजही खूप वाईट वाटते!’

खरं तर ही एका बापाची आपल्या मुलाच्या प्रेमापोटी व्यक्त झालेली प्रांजळ भावना; पण त्याने पडद्यामागे चालते तरी काय, हा प्रश्न व्यवस्थेसमोर यानिमित्ताने मांडून ठेवलाय, हेच खरे. अश्विन जवळपास दशकभर आपल्या सर्वोच्च बहरात राहिला, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याचे योगदान विशेष दखलपात्र. तरीही तळ्यामळ्यातील स्थान त्याच्या मनात घोळत नसते तरच नवल होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचे सध्याचेच उदाहरण घेऊयात. गुलाबी चेंडूवरील कसोटीसाठी अश्विनला पसंती मिळाली जरूर; पण पर्थमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ब्रिस्बेनमध्ये तिसर्‍या कसोटीतही त्याची जागा जडेजाला देण्यात आली आणि अश्विन पुन्हा बाहेर! ही अपमानाची भावना त्याला छळत होती... अखरे भावनांचा कडेलोट झाला, संयमाचा बांध फुटला आणि स्वाभिमान दाखवत अश्विनने मालिकेच्या मध्यातच निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला. चाहत्यांसाठी, क्रिकेट वर्तुळासाठी नव्हे, तर अगदी त्याच्या कुटुंबीयांसाठीही हा मोठा धक्का होता. अश्विनचे वडील नकळत बोलून गेले, त्याचा हा निर्णय त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्हालाही कळवला नव्हता...

सार इतकेच... असा अश्विन पुन्हा होणे नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news