स्पोर्ट्स

AUS vs ENG 3rd Test : ॲडलेड कसोटीत ‘Snicko’ वरून वाद पेटला..! मिचेल स्टार्कचा संताप, थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Ashes Series : 'अत्यंत भिकार तंत्रज्ञान...', मिचेल स्टार्कचा मैदानात संयम सुटला

रणजित गायकवाड

Ashes Series 2025-26 AUS vs ENG Adelaide Test Snicko Controversy

ॲडलेड : क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'ॲशेस' (Ashes 2025-26) मालिकेत सध्या 'स्निकोमीटर' (Snicko) तंत्रज्ञानाची चर्चा रंगली आहे. ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी स्निकोच्या चुकीच्या निर्णयामुळे मोठा गदारोळ झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने तर भर मैदानात आपला संयम गमावत या तंत्रज्ञानावर सडकून टीका केली.

नेमकं प्रकरण काय?

इंग्लंडच्या डावातील ४४ वे षटक सुरू असताना हा वाद ओढवला. कर्णधार पॅट कमिन्सने टाकलेला एक भेदक शॉर्ट-पिच चेंडू इंग्लंडचा फलंदाज जेमी स्मिथच्या खांद्यापर्यंत उसळला. स्मिथने तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला असता, चेंडू स्पष्टपणे त्याच्या ग्लोव्हजला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाच्या हातात विसावला.

मैदानी पंच नितीन मेनन यांना खात्री नसल्याने त्यांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. मात्र, रिप्लेमध्ये जे पाहायला मिळालं त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

तंत्रज्ञानाचा 'लोचा' की पंचांची चूक?

जेव्हा चेंडू बॅट किंवा ग्लोव्हजच्या जवळून गेला, तेव्हा स्निकोमीटरवर कोणतीही हालचाल दिसली नाही. मात्र, चेंडू हेल्मेटपासून बराच लांब असताना अचानक स्निकोवर लाईन दिसू लागली. यामुळे थर्ड अंपायर क्रिस गाफने यांनी जेमी स्मिथला 'नॉट आऊट' घोषित केले. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू संतापले.

हा निर्णय आल्यानंतर मिचेल स्टार्कचा पारा चढला आणि त्याने ‘स्निको फेकून द्या, हे पूर्णपणे निकामी तंत्रज्ञान आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. स्टंप माईकमध्ये त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला, ज्यात त्याने म्हटले की, ‘स्निको हटवून टाकायला हवे. कालही याने चूक केली आणि आजही तीच पुनरावृत्ती होत आहे. हे अत्यंत भिकार तंत्रज्ञान आहे.’

दोन षटकांनंतर पुन्हा तोच ड्रामा

या घटनेनंतर दोनच षटकांनी पॅट कमिन्सने पुन्हा एकदा जेमी स्मिथला बाद करण्याची संधी निर्माण केली. यावेळी यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने झेल घेतला. पंच नितीन मेनन यांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळी रिप्लेमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये स्पष्ट अंतर दिसत असूनही स्निकोने 'स्पाइक' दाखवला आणि स्मिथला 'आऊट' देण्यात आले. या निर्णयावर जेमी स्मिथ आणि बेन स्टोक्स यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाचे मुद्दे :

  • पहिली घटना : चेंडू ग्लोव्हजला लागूनही स्निकोने साथ दिली नाही; फलंदाज वाचला.

  • दुसरी घटना : चेंडू आणि बॅटमध्ये अंतर असतानाही स्निकोने लाईन दाखवली; फलंदाज बाद झाला.

  • स्टार्कचा संताप : तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेवर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य गोलंदाजाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

  • इंग्लंडची भूमिका : बेन स्टोक्स आणि स्मिथनेही या विसंगत निर्णयांबद्दल नाराजी दर्शवली.

ॲशेससारख्या हाय-प्रोफाईल मालिकेत तंत्रज्ञानाच्या अशा चुकांमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो, अशी भीती आता क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आता या वादावर आयसीसी (ICC) काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT