स्पोर्ट्स

Aryavir Sehwag : पाकिस्तानी फॅन्सनी दिल्या वीरेंद्र सहवागच्या नावानं घोषणा! आर्यवीरने शेअर केला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा

Aryavir Sehwag U19 Asia Cup final : 'थरारक सामन्याच्या शेवटच्या क्षणी 'सीता राम, सीता राम' असा जप करत होतो'

पुढारी वृत्तसेवा

Aryavir Sehwag U19 Asia Cup final : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग याचा मुलगा आर्यवीर सहवागने शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर) त्याच्या कारकिर्दीतील सर्वात थरारक विजयांपैकी एक अनुभवला. या विजयानंतर वडील वीरेंद्र सहवाग यांच्याशी केलेल्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. व्हिडिओ कॉलवर त्याने भारताच्या शेवटच्या चेंडूवरील थरारक विजयाची आठवण सांगितली आणि तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःला कसे शांत ठेवले, याचा खुलासाही केला.

वीरेंद्र सेहवागने केला इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर

वीरेंद्र सेहवागने आर्यवीरबरोबर झालेल्या संवादाची एक झलक इंस्टाग्रामवर शेअर केली. हा पिता-पुत्रांमधील एक अतिशय अविस्मरणीय क्षण होता. आशिया चषक U19 स्पर्धेतील अंतिम सामन्यातील कामगिरीबाबत वीरेंद्रने मुलाचे अभिनंदन केले. तेव्हा आर्यवीरने उत्साहाने सांगितले की, प्रतिस्पर्धी संघाच्या प्रेक्षकांकडून 'सहवाग, सहवाग' अशा घोषणा ऐकून तो थक्क झाला होता.

'सीता राम, सीता राम' असा जप करत होता

वीरेंद्र सहवागने शेअर केलेल्या व्हिडिओ कॉलवरून, अंतिम सामन्यातील दडपणाचा सामना आर्यवीरने कसा केला, याची झलक पाहायला मिळाली. आपल्या वडिलांशी उत्साहाने बोलताना त्याने सांगितले की, विजयासाठी काही धावांची गरज असताना शेवटच्या षटकात तो सतत 'सीता राम, सीता राम' असा जप करत होता. व्हिडिओ कॉलमध्ये आर्यवीर म्हणाला, "शेवटच्या षटकात मी सतत 'सीता राम, सीता राम' म्हणत होतो. आम्ही सर्वजण फक्त एका बाउंड्रीची (चौकार किंवा षटकार) अपेक्षा करत होतो आणि ती अगदी शेवटच्या चेंडूवर मिळाली."

नेहमी संयमित दिसणारा आर्यवीर, विजयानंतर केला एकच जल्लोष

अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करताना अत्यंत संयमित दिसणाऱ्या आर्यवीरचे हे एक वेगळेच रूप होते. भारताने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून ३३८ धावांचे लक्ष्य गाठत एक विकेटने नेत्रदीपक विजय मिळवला, त्यानंतर आर्यवीरने एकच जल्लोष केला.

आर्यवीर ठरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'

संपूर्ण स्पर्धेत आर्यवीर भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक ठरला. त्याने पाच डावांत ९०.२५ च्या सरासरीने ३६१ धावा केल्या. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीत एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अंतिम सामन्‍यातही केली दमदार कामगिरी

संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात त्याने १६० धावांची धडाकेबाज खेळी केली, जी या स्पर्धेतील एका खेळाडूची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्यानंतर त्याने मलेशियाविरुद्ध नाबाद ७० धावा आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत ५१ धावा केल्या. याच फॉर्मला कायम राखत त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात आर्यवीरने ६१ चेंडूंत ५८ धावांची झुंजार खेळी केली, ज्यामध्ये त्याने नऊ चौकार लगावले. अली रझाचा चेंडू हातावर लागल्यामुळे दुखापत होण्याची भीती निर्माण झाली होती, तरीही त्याने जिद्दीने फलंदाजी सुरू केली आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानीसोबत मिळून ९७ धावांची सलामी दिली.

विराट स्टाईल केले सेलिब्रेशन

आपले अर्धशतक पूर्ण केल्यावर, आर्यवीरने या क्षणाला एका खास शैलीत साज चढवला. त्याने विराट कोहलीच्या प्रसिद्ध 'माझी बॅटच बोलेल' या सेलिब्रेशनची हुबेहूब नक्कल केली. कोहलीने २०१८ मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले २५ वे कसोटी शतक झळकावल्यानंतर हीच कृती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT