इस्लामाबाद : भारत-पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील वैर, तिरस्काराची भावना सर्वश्रुत आहे. दोन्ही संघांचे चाहते एकमेकांना कसे पाण्यात पाहतात, हे देखील सर्वश्रुत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर, भारतीय महिला संघाला पाठिंबा देणाऱ्या एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून आपला पहिला-वहिला महिला विश्वचषक जिंकल्यानंतर हा प्रसंग समोर आला. हा व्हायरल क्षण तेव्हा समोर आला, जेव्हा अर्शद मुहम्मद हनीफ नावाचा एक पाकिस्तानी क्रिकेट चाहता अंतिम सामन्यापूर्वी आपल्या कुटुंबासह भारताचे राष्ट्रगीत गाताना दिसला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये या गटाने पाकिस्तानची जर्सी परिधान करून भारतासाठी उत्साहाने जयघोष केल्याचे दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना हनीफने लिहिले : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी सुनिधी चौहान भारताचे राष्ट्रगीत गात असतानाचा हा एक अभिमानास्पद क्षण! अंगावर शहारे आले. आपल्या ‘वूमेन इन ब्ल्यू’साठी जोरदार जयघोष करूया - चषक घरी आणा.
भारताच्या विजयानंतर, त्याने आणखी एक संदेश शेअर करत अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या : महिला वन-डे विश्वविजेते झाल्याबद्दल भारतीय संघाचे खूप खूप अभिनंदन! पाकिस्तानातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम. मला आशा आहे की, एक दिवस पाकिस्तानच्या तरुण मुलीही पुढे येतील आणि हरमनप्रीत कौरप्रमाणे चॅम्पियन बनतील.