Arjun Tendulkar Video Pudhari
स्पोर्ट्स

Arjun Tendulkar Video: 3 विकेट्स आणि 66 धावा! अर्जुन तेंडुलकरचा वानखेडेवर धडाका; 34 चेंडूत सामना संपवला

Arjun Tendulkar Video: T20 मुंबई लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने अष्टपैलू कामगिरी करत ARCS अंधेरीला शानदार विजय मिळवून दिला.

पुढारी वृत्तसेवा

Arjun Tendulkar Video: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. T20 मुंबई लीगमध्ये अर्जुनने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोलंदाजीत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवल्यानंतर त्याने फलंदाजीतही वादळी खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

वानखेडे स्टेडियमवर 8 जून रोजी बांद्रा ब्लास्टर्स आणि ARCS अंधेरी यांच्यात सामना रंगला. या सामन्यात ARCS अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने प्रथम गोलंदाजीत आपली छाप पाडली. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने केवळ 3 षटकांत 11 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. विशेष म्हणजे त्याने टाकलेल्या 18 चेंडूंपैकी तब्बल 13 चेंडू निर्धाव होते.

अर्जुनच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे बांद्रा ब्लास्टर्सचा डाव 20 षटकांत 9 बाद 144 धावांवर आटोपला. त्यानंतर 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ARCS अंधेरीला सुरुवातीला एक धक्का बसला. मात्र त्यानंतर अर्जुन तेंडुलकर मैदानात उतरला आणि सामन्याचे चित्रच बदलून टाकले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याच्या फटक्यांपुढे बांद्रा ब्लास्टर्सचे गोलंदाज हतबल झाले. अर्जुनने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याची फटकेबाजी सुरूच राहिली.

अर्जुन तेंडुलकरने 34 चेंडूत नाबाद 66 धावांची तुफानी खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 194.12 इतका होता. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे T20 मुंबई लीगमधील ARCS अंधेरी संघासाठी हे त्याचे पहिले अर्धशतक ठरले.

अर्जुनच्या या दमदार खेळीमुळे ARCS अंधेरीने 9 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. गोलंदाजीत 3 विकेट्स आणि फलंदाजीत नाबाद 66 धावा अशी अष्टपैलू कामगिरी करत अर्जुन तेंडुलकर सामन्याचा खरा हिरो ठरला.

गेल्या काही काळापासून अर्जुन तेंडुलकरवर अनेकांच्या नजरा आहेत. वडील सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा वारसा पुढे नेताना त्याच्यावर मोठा दबाव असतो. मात्र अशा कामगिरीमुळे तो स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. T20 मुंबई लीगमधील त्याच्या या शानदार प्रदर्शनानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याच्या भविष्यातील कारकिर्दीबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT