स्पोर्ट्स

Gambhir-Gill Controversy : विजयासाठी कायपण! WTC गुण गमावण्याचा धोका पत्करत गंभीर-गिलने सामनाधिकाऱ्यांचा इशारा झुगारला

‘WTC चे 4 गुण गेले तरी चालतील. मला षटकांच्या गतीची पर्वा नाही’

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : ओव्हल येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर भारताने मिळवलेला सहा धावांचा थरारक विजय आता एका रंजक पार्श्वभूमीसह समोर आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेतील गुण गमावण्याची शक्यता असतानाही, धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल सामनाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी दुर्लक्ष केले आणि एका अविस्मरणीय विजयाला गवसणी घातली.

कसोटीच्या शेवटच्या दिवशी सामना अत्यंत चुरशीच्या स्थितीत होता. इंग्लंडला विजयासाठी केवळ ३५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे चार गडी शिल्लक होते, तर दुसरीकडे भारताला मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यासाठी उर्वरित चार गडी बाद करणे आवश्यक होते. मैदानावरील तणाव वाढत असतानाच, मैदानाबाहेरही दबावतंत्राचे नाट्य सुरू झाले होते.

'दैनिक जागरण'च्या वृत्तानुसार, सामनाधिकारी जेफ क्रो यांनी अंतिम दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला स्पष्ट संदेश पाठवला होता. भारतीय संघ निर्धारित वेळेपेक्षा सहा षटके मागे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते. याचे गंभीर परिणाम होऊ शकले असते; जर भारताला इंग्लंडला बाद करता आले नसते आणि षटकांची गती सुधारली नसती, तर संघाला WTC मधील चार महत्त्वाचे गुण गमवावे लागले असते.

नव्या WTC पर्वातील ही भारताची पहिलीच मालिका होती आणि मागील अंतिम फेरीत स्थान मिळवता न आल्याने प्रत्येक गुण अत्यंत महत्त्वाचा होता. या पार्श्वभूमीवर, सामनाधिकाऱ्यांचा इशारा ड्रेसिंग रूममध्ये रणनीतीवर चर्चा करण्यास पुरेसा होता.

गिल, गंभीर, सहायक प्रशिक्षक सितांशू कोटक आणि इतर सदस्यांनी रणनीतीत बदल करण्यावर चर्चा केली. वृत्तानुसार, षटकांची गती वाढवण्यासाठी दोन्ही फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना गोलंदाजीसाठी पाचारण करण्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, यात स्पष्ट धोका होता. इंग्लंडचे जेमी स्मिथ आणि जेमी ओव्हरटन खेळपट्टीवर स्थिरावले होते आणि वेगवान गोलंदाजीच्या अनुपस्थितीचा फायदा उचलून ते सहज लक्ष्य गाठू शकले असते.

याचवेळी टीम इंडियाचे मुख्य कोच गंभीर यांनी आपला कणखर बाणा दाखवला. ‘‘मला षटकांच्या गतीची (ओव्हर रेट) पर्वा नाही,’’ असे ते ठामपणे सांगितले. ‘चार गुण गेले तरी चालतील. आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळत आहोत.’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

गिलने आपल्या प्रशिक्षकाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि निर्णय पक्का झाला. षटकांच्या गतीची चिंता न करता वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरूच ठेवतील.

हा निर्णय अचूक ठरला. नवीन चेंडू मिळण्यास २२ चेंडू बाकी असतानाही, दोन्ही वेगवान गोलंदाजांनी जुन्या चेंडूवरच इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. सिराजने प्रथम जेमी स्मिथला आणि त्यानंतर ओव्हरटनला बाद करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. आकाश दीपच्या सीमारेषेवरील चुकीच्या अंदाजामुळे गस ऍटकिन्सनने मारलेला षटकार आणि ध्रुव जुरेलने गमावलेली धावबादची संधी यामुळे सामना श्वास रोखून धरणाऱ्या क्षणी पोहोचला होता.

अखेरीस, सिराजनेच ऍटकिन्सनला बाद करून अलीकडच्या काळातील सर्वात नाट्यमय कसोटी विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह भारताच्या वेगवान गोलंदाजीची रणनीती यशस्वी झाली. टीम इंडियाने केवळ मालिका बरोबरीतच सोडवली नाही, तर महत्त्वपूर्ण २८ डब्ल्यूटीसी गुणही मिळवले. आयसीसीच्या इशाऱ्यानंतरही, विजयामुळे भारताचे गुण कापले गेले नाहीत, उलट धीम्या षटकांच्या गतीमुळे इंग्लंडला दोन डब्ल्यूटीसी गुण गमवावे लागले.

या विजयासह, भारत आता डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेनंतर तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर, या निकालाने गंभीर यांच्या कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याच्या आक्रमक प्रशिक्षण शैलीचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT