स्पोर्ट्स

Asian Games 2026 : लांब उडीमध्ये २ सेंटिमीटरने हुकले भारताचे गोल्ड मेडल! भारताच्या एन्सी सोजनला रौप्यपदक

Ancy Sojan Silver Medal : शेवटच्या क्षणी थरार! चीनच्या हुआंग यिंगयिंगने बाजी पलटवली

रणजित गायकवाड

एशियन गेम्स २०२६ मधील महिला लांब उडी (लॉन्ग जंप) स्पर्धेचा अंतिम सामना अखेरच्या प्रयत्नापर्यंत कमालीचा उत्कंठावर्धक ठरला. भारताची आघाडीची ॲथलीट एन्सी सोजन एडाप्पिल्ली अखेरच्या क्षणापर्यंत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होती. मात्र, अंतिम प्रयत्नात चीनच्या हुआंग यिंगयिंगने बाजी पलटवली. हुआंगने ६.५५ मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत एन्सीपेक्षा अवघ्या २ सेंटिमीटरच्या फरकाने सुवर्णपदक पटकावले. एन्सीला तिच्या ६.५३ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अवघ्या २ सेंटिमीटरच्या फरकाने सुवर्णपदक हुकले

२५ वर्षीय एन्सीने सामन्याची सुरुवात अत्यंत आक्रमक पद्धतीने केली. पहिल्याच प्रयत्नात ६.४९ मीटरची उडी मारून तिने आघाडी घेतली होती. त्यानंतर पाचव्या प्रयत्नात अधिक सरस कामगिरी करत तिने ६.५३ मीटरचा टप्पा गाठला आणि सुवर्णपदकावर भक्कम दावा ठोकला. अंतिम फेरीपर्यंत ती अव्वल स्थानी कायम होती. मात्र, सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात चीनच्या हुआंग यिंगयिंगने ६.५५ मीटरची शानदार झेप घेत संपूर्ण चित्र बदलले. एन्सीचा शेवटचा प्रयत्न ६.४९ मीटर राहिल्याने तिला पाचव्या प्रयत्नातील कामगिरीत सुधारणा करता आली नाही. सुवर्णपदक हुकले असले, तरी सलग दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकून तिने आपली सातत्यपूर्ण कामगिरी अधोरेखित केली.

शाइली सिंहचे कांस्यपदक अखेरच्या क्षणी निसटले

भारताची दुसरी स्पर्धक शाइली सिंह हीदेखील बराच वेळ पदकाच्या शर्यतीत कायम होती. सुरुवातीला ६.४१ मीटर आणि नंतर ६.४२ मीटरची उडी घेत ती तिसऱ्या स्थानावर होती. मात्र, अखेरच्या प्रयत्नात चीनच्या तान मेंगयीने ६.४६ मीटर उडी मारून शाइलीला मागे टाकत कांस्यपदक पटकावले. शाइली ६.४२ मीटरच्या प्रयत्नासह चौथ्या स्थानावर फेकली गेल्याने तिचे पोडियम फिनिश हुकले.

शाइलीसाठी हा सामना आव्हानात्मक ठरला. वेगवान वारा आणि पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा तिच्या कामगिरीवर परिणाम झाला. अनेकदा तिने टेक-ऑफ लाईनच्या आधीच उडी घेतली. एका प्रयत्नाच्या गुणांकनावरून तिने पंचांशी प्रदीर्घ चर्चा केली, परंतु निर्णय तिच्या बाजूने आला नाही.

अखेरच्या प्रयत्नांमधील नाट्यमय घडामोडींमुळे चीनने सुवर्ण आणि कांस्य अशा दोन्ही पदकांवर कब्जा केला, तर भारताच्या खात्यात रौप्यपदक जमा झाले. एन्सीच्या या रौप्यपदकामुळे भारताला ॲथलेटिक्समध्ये आणखी एक पदक लाभले असले, तरी वैयक्तिक सुवर्णपदकाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT