

तिरुवनंतपुरम : भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (ODI) सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्ह्जने आपल्या कारकिर्दीतील ऐतिहासिक खेळी साकारली आहे. ३२ वर्षीय ग्रीव्ह्जने १०४ चेंडूंत आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावत वेस्ट इंडिजसाठी एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील पहिले शतक ठोकणारा तो वेस्ट इंडिजचा तिसरा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या लढतीत भारताकडून नमन धीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजला सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्ह्ज या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी भारतीय आक्रमणाचा संयमाने सामना करत तब्बल २० षटकांपर्यंत एकही गडी बाद होऊ दिला नाही.
भारतात वेस्ट इंडिजची तिसरी सर्वोच्च सलामी भागीदारी कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्ज यांनी पहिल्या गड्यासाठी १३५ धावांची शतकी भागीदारी रचली. भारतीय भूमीवर भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांतील वेस्ट इंडिजची ही तिसरी सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे. कॅम्पबेलने अर्धशतकी खेळी साकारत ५० हून अधिक धावांचे योगदान दिले (त्याच्या कारकिर्दीतील दुसरे ५०+ धावसंख्या). २०व्या षटकात कुलदीप यादवने कॅम्पबेलला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली.
भारतीय भूमीवर भारत विरुद्ध विंडीज: सर्वोच्च सलामी भागीदाऱ्या
१६४ धावा : गॉर्डन ग्रिनिज आणि फिल सिमन्स (त्रिवेंद्रम - नेहरू स्टेडियम, १९८८)
१४९ धावा : गॉर्डन ग्रिनिज आणि डेसमंड हेन्स (इंदूर - नेहरू स्टेडियम, १९८३)
१३५ धावा : जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्ह्ज (त्रिवेंद्रम - ग्रीनफिल्ड स्टेडियम, २०२६)
पहिले एकदिवसीय शतक ठोकणारे विंडीजचे सर्वांत वयस्कर फलंदाज आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शतकी टप्पा ओलांडणारा ग्रीव्ह्ज या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे:
क्लेइटन लॅम्बर्ट : ३६ वर्षे ५७ दिवस (११९ धावा वि. इंग्लंड, पोर्ट ऑफ स्पेन, १९९८)
शमर ब्रूक्स : ३३ वर्षे २४६ दिवस (नाबाद १०१ धावा वि. नेदरलँड्स, ॲमस्टेलवीन, २०२२)
जस्टिन ग्रीव्ह्ज : ३२ वर्षे २१३ दिवस (१०१ धावा वि. भारत, तिरुवनंतपुरम, २०२६)
ट्रॅव्हिस डाऊलिन : ३२ वर्षे १५४ दिवस (नाबाद १०० धावा वि. बांगलादेश, रोसो, २००९)
भारताविरुद्ध शतक ठोकणारा सहावा सलामीवीर ग्रीव्ह्ज भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा वेस्ट इंडिजचा केवळ सहावा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी गॉर्डन ग्रिनिज (१९८३), फिल सिमन्स (१९८८), ख्रिस गेल (२००२ - तीन शतके), शिवनारायण चंद्रपॉल (२००७) आणि शाई होप (२०१९) यांनी सलामीवीर म्हणून भारताविरुद्ध शतके झळकावली होती. २०२६ मध्ये ग्रीव्ह्जने या दिग्गजांच्या पंक्तीत आपले नाव नोंदवले.
शतक पूर्ण केल्यानंतर ग्रीव्ह्ज फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. ३६व्या षटकात कुलदीप यादवने त्याला १०१ धावांवर (१०८ चेंडू, १२ चौकार) पायचीत (LBW) केले. त्यानंतरच्या चेंडूवर कुलदीपने ज्वेल अँड्र्यूला बाद करत हॅटट्रिकची संधी निर्माण केली होती, मात्र तो हॅटट्रिक नोंदवण्यात अपयशी ठरला. ग्रीव्ह्जच्या या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली.