Anaya Bangar on Marizanne Kapp : क्रिकेट मैदानावर पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या अनाया बांगर ( Anaya Bangar)ने दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिझान कॅप हिच्यावर जोरदार पलटवार केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) अनायाला महिला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची परवानगी दिल्याबद्दल कॅप हिने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यावर, या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी या विषयाची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे, असे अनायाने ठणकावले आहे.
ऑस्ट्रेलियाने (CA) अनायाला महिला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयावर टीका करताना दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू कॅप हिने म्हटले की, ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाऊ नये. कॅपने तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिले, "हे अत्यंत हास्यास्पद आहे; याला परवानगी मिळायला नको."
वृत्तसंस्था 'पीटीआय'शी अनायाने कॅपच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, "जे लोक या निर्णयाला विरोध करत आहेत, त्यांनी आधी या विषयाचा अभ्यास करून स्वतःला शिक्षित केले पाहिजे. मला कोणत्याही प्रकारचा अवाजवी फायदा मिळत नाही. मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करत आहे, हे मी आधीच स्पष्ट केले आहे," असे अनाया म्हणाली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून हिरवा कंदील मिळाला असला तरी अनायाला थेट कोणत्याही व्यावसायिक संघात स्थान मिळालेले नाही. सध्या ती ऑस्ट्रेलियातील कोणत्याही राज्य किंवा प्रदेशात प्रीमियर क्रिकेट खेळू शकते. यासाठी ती काही स्थानिक क्लबच्या संपर्कात असून लवकरच संघ निवडणार आहे. 'वुमेन्स बिग बॅश लीग' (WBBL) मध्ये खेळणे हे तिचे मुख्य ध्येय असून त्यासाठी तिला आधी क्लब क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. याबाबत अनाया म्हणाली की, माझ्यासाठी ही प्रदीर्घ काळाची अस्तित्वाची लढाई होती. आता ती हळूहळू या सर्व घडामोडींमधून बाहेर पडून आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेली मान्यता ही कोणतीही साधी किंवा अनौपचारिक प्रक्रिया नव्हती, हे अनायाने स्पष्ट केले. तिच्या प्रकरणात बोर्डाने वैद्यकीय व सर्जिकल इतिहास, संप्रेरके (हॉर्मोन्स) आणि टेस्टोस्टेरॉन अहवाल, क्रिकेटची पार्श्वभूमी, मॅच फुटेज तसेच 'मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी'च्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सशी संबंधित वैज्ञानिक चाचण्यांचे पुनरावलोकन केले आहे. जुलैमध्ये झालेल्या रक्ताच्या चाचणीत तिचे एकूण टेस्टोस्टेरॉन प्रमाण ०.६ नॅनोमोल प्रति लिटर इतके नोंदवले गेले होते.
अनाया बांगरचे उच्चस्तरीय (एलीट) क्रिकेटमधील पुनरागमन मार्च २०२७ पासून लागू होणाऱ्या धोरणात्मक अटींवर अवलंबून असेल. तोपर्यंत ती कम्युनिटी किंवा प्रीमियर क्रिकेट खेळू शकते. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मंजुरीचा अर्थ थेट डब्ल्यूबीबीएल (WBBL) करार असा होत नाही. अनायाला आधी पूर्ण तंदुरुस्ती मिळवून क्लब क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी सिद्ध करावी लागेल.