
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि माजी बॅटिंग कोच संजय बांगर याच्या मुलाचा (Sanjay Bangar son Aryan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.बांगर यांचा मुलगा 'आर्यन' (Aryan) शस्त्रक्रियेद्वारे 'अनाया' (Anaya) बनली आहे. आर्यनने त्याच्या १० महिन्यांच्या हार्मोनल बदलाचा प्रवास व्हिडिओतून शेअर केलाय.
इन्स्टग्राम रीलमध्ये २३ वर्षीय आर्यनने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यासोबत आणि त्याच्या वडिलासोबतचा जुना फोटोदेखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आला. 'आर्यन'ची बनलेली 'अनाया' सध्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहते.
आर्यनच्या या ताज्या खुलाशाची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे. बांगर यांचा मुलगा आर्यन याची "ट्रान्स वुमन" म्हणून ओळख पुढे आली होती. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा उल्लेख केला आहे. पोस्टमध्ये त्याने आपले नाव बदलून अनाया असे नमूद केले आहे. त्याने पुष्टी केली आहे की लिंग बदल शस्त्रक्रिया होऊन अकरा महिने झाले आहेत.
२३ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या क्रिकेटवरील प्रेमाबद्दल सांगितले आहे. माझ्यावरील शस्त्रक्रियेनंतर खेळापासून कसा दुरावलो?. याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्याने १२ कसोटी सामने आणि १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या आणि २०१४ ते २०१८ च्या हंगामात बॅटिंग कोच म्हणून काम केलेल्या त्याच्या वडिलांकडून प्रेरणा कशी घेतली? याचाही उल्लेख पोस्टमध्ये केलाय.
“लहानपणापासूनच क्रिकेट माझ्या जीवनाचा एक भाग राहिला आहे. मी मोठे झाल्यावर माझ्या वडिलांना देशाचे प्रतिनिधित्व करताना आणि प्रशिक्षण देताना पाहिले. मला वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचे स्वप्न पडायला फार काळ लागला नाही. त्यांची खेळाप्रती असलेली आवड, शिस्त आणि समर्पण वृत्ती माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. क्रिकेट हे माझे प्रेम, माझी महत्त्वाकांक्षा आणि माझे भविष्य बनले. मी माझे संपूर्ण आयुष्य माझे कौशल्य दाखवण्यात घालवले. या आशेने की एके दिवशी मला वडिलांप्रमाणे मलाही देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.''
“माझी आवड, माझे प्रेम असलेला खेळ मी कधीही सोडून देण्याचा विचार केला नाही. पण मी एका वेदनादायी वास्तवाला सामोरे जात आहे. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) केल्याने एक ट्रान्स वुमन म्हणून माझ्या शरीरात लक्षणीय बदल झाला आहे. मी स्नायूंची ताकद, स्नायूंची स्मरणशक्ती आणि एक खेळाडू म्हणून क्षमता गमावत आहे; ज्यावर मी कधीकाळी अवलंबून होतो. मी लहानपणापासून आवडणाऱ्या खेळापासून दूर जात आहे,” असे आर्यनने (आता अनया) पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर पोस्टमध्ये ट्रान्स महिलांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केलाय; ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे आहे. याहून अधिक दुखावणारी गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांसाठी कोणतेही असे खास नियम नाहीत. मला असे वाटते की सिस्टम मला जबरदस्तीने बाहेर घालवत आहे. माझ्याकडे टॅलेंट नसल्यामुळे नाही, तर नियमांना मी कोण आहे? याची जाणीवच झालेली नाही म्हणून. माझे शरिरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण ०.५ एनएमओएल पर्यंत खाली आले आहे, जे सरासरी सिजेंडर महिलेसाठी सर्वात कमी असू शकते. असे असतानाही माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अथवा व्यावसायिक स्तरावर माझा खेळण्यासाठी मला स्थान नाही.'' अशी भावूक पोस्ट तिने लिहिली आहे.