स्क्वॅशच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्‍या अनाहत सिंग व अभय सिंग यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. File Photo
स्पोर्ट्स

Asian Games 2026 : भारताच्‍या नावावर ३२ वे पदक; अभयपाठोपाठ अनाहतनेही 'स्क्वॅश'मध्‍ये जिंकले रौप्य

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 'स्क्वॅश'मध्‍ये मिश्र दुहेरीत जिंकले होते कांस्यपदक

पुढारी वृत्तसेवा

Anahat Singh Asian Games Squash Silver Medal : भारताने आपले ३२ वे पदक निश्चित केले आहे. स्क्वॅशच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अनाहत सिंगचा मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यम हिच्याकडून ३-० असा पराभव झाला. शिवसंगरीने ११-४, ११-४, ११-७ अशा फरकाने सामना जिंकत सुवर्णपदक पटकावले. तर अनाहतला रौप्‍यवर समाधान मानावे लागले.

शिवसंगरीचा अनाहतविरुद्ध सलग तिसरा विजय

शिवसंगरी जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून, ती मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आहे. अनाहतविरुद्धचा तिचा हा सलग तिसरा विजय ठरला. मलेशियाने पुरुष आणि महिला एकेरी अशा दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक जिंकले, तर भारताला दोन्हीमध्ये रौप्यपदक मिळाले. एनजी आणि शिवसंगरी यांनी यापूर्वी २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत याच प्रकारांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

अभय सिंग सुवर्णपदकापासून वंचित

भारताने आजचे पहिले पदक निश्चित केले आहे. अभय सिंगने पुरुष एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्यपदक जिंकले. अंतिम सामन्यात त्याला मलेशियाच्या एनजी ईन यो कडून ११-९, ११-५, ११-५ असा पराभव स्वीकारावा लागला. अभयचा ३-० असा पराभव झाला आणि एनजीने सुवर्णपदक जिंकले. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे ३१ वे आणि स्क्वॅशमधील दुसरे पदक आहे. याआधी, जोशना चिनप्पा आणि सेंथिलकुमार यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते.

ट्रॅप शूटिंगमध्ये भारतीय पुरुष संघ सातव्या स्थानावर

पुरुष ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाजांची कामगिरी आतापर्यंत साधारण राहिली आहे. वैयक्तिक गटात, कायनान चेनाई ४७ गुणांसह ११ व्या स्थानावर आहे. शपथ भारद्वाज ४५ गुणांसह २२ व्या, तर अहवर रिझवी ४१ गुणांसह ३५ व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या ट्रॅप सांघिक क्रमवारीत भारतीय संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. मात्र, स्पर्धेचे दोन दिवस बाकी असल्याने भारतीय नेमबाजांना आपली क्रमवारी सुधारण्याची संधी आहे. ट्रॅप प्रकारातील दोन दिवस अजून बाकी आहेत; आगामी फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करून पदकाच्या शर्यतीत परतण्याचे लक्ष्य भारतीय नेमबाजांचे असणार आहे.

पुरुष आणि महिलांचे रिकर्व्ह तिरंदाजी संघ उपांत्य फेरीत दाखल

भारताने रिकर्व्ह गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली असून, पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. पुरुष संघाने चीनचा ५-१ असा पराभव केला, तर महिला संघाने चायनीज तैपेईवर ६-० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत चीनविरुद्ध भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने दमदार खेळ करत ५-१ अशा फरकाने सामना जिंकला आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. महिला रिकर्व्ह संघाने चायनीज तैपेईविरुद्ध एकतर्फी सामना खेळत ६-० असा विजय मिळवला आणि अंतिम चारमध्ये (उपांत्य फेरीत) प्रवेश निश्चित केला. या विजयांसह, भारताचे पुरुष, महिला आणि मिश्र रिकर्व्ह संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. तिन्ही संघांचे उपांत्य फेरीतील सामने २ ऑक्टोबर २०२७ रोजी खेळवले जातील. आजची तिरंदाजी स्पर्धा येथे संपली असून, उद्यापासून वैयक्तिक कंपाऊंड प्रकारांना सुरुवात होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT