स्पोर्ट्स

Akash Deep ICC Ranking : आकाशदीपचा कसोटी रँकिंगमध्ये धमाका! 39 स्थानांची गरुडझेप घेत अनेक दिग्गजांना टाकले मागे

सिराजच्या क्रमवारीतही सुधारणा, बुमराहचे अव्वल स्थान कायम

रणजित गायकवाड

इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने आता आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीतही आपली चमक दाखवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या भेदक मा-याच्या जोरावर त्याने गोलंदाजांच्या यादीत तब्बल 39 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. या प्रभावी कामगिरीने तो अनेक अनुभवी खेळाडूंना मागे टाकण्यात यशस्वी झाला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपला संघात स्थान मिळाले. या संधीचे त्याने सोने केले. त्याने सामन्यात एकूण 10 बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच उत्कृष्ट प्रदर्शनाचे त्याला आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत बक्षिस मिळाले आहे.

आकाश दीप 45 व्या स्थानी; सिराजच्या क्रमवारीतही सुधारणा

आयसीसीने 9 जुलै रोजी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत आकाश दीप 39 स्थानांची प्रगती करत थेट 45 व्या क्रमांकावर पोहोचला. त्याचे एकूण रेटिंग 452 असून ही त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर, एजबॅस्टन कसोटीत 7 बळी घेणाऱ्या मोहम्मद सिराजच्या (619 रेटिंग) क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. त्याने 6 स्थानांची झेप घेत 22 वे स्थान पटकावले आहे.

बुमराहचे अव्वल स्थान कायम

एजबॅस्टन कसोटीत विश्रांती देण्यात आलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान अबाधित राखण्यात यशस्वी ठरला आहे. 898 मानांकन गुणांसह तो पहिल्या 10 गोलंदाजांमधील एकमेव भारतीय आहे. संघातील अन्य गोलंदाजांमध्ये, रवींद्र जडेजाची एका स्थानाने घसरण झाली असून, तो आता 14 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT