Ajinkya Rahane Ravi Shastri Mimicry Video Pudhari
स्पोर्ट्स

Ajinkya Rahane: शांत स्वभावाचा रहाणे बनला ‘रवी शास्त्री’; मिमिक्री पाहून कॉमेंन्ट्री बॉक्समध्ये हशा, Video होतोय व्हायरल

Ajinkya Rahane Ravi Shastri Mimicry Video: निवृत्तीनंतर समालोचनाच्या नव्या इनिंगला सुरुवात करणाऱ्या अजिंक्य रहाणेने गॉल कसोटीदरम्यान रवी शास्त्री यांच्या खास शैलीची भन्नाट नक्कल केली.

पुढारी वृत्तसेवा

Ajinkya Rahane Ravi Shastri Mimicry Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे नुकताच क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त झाला. मैदानावरील आपली इनिंग संपवल्यानंतर आता त्याने करिअरची नवी सुरुवात केली आहे. रहाणे आता समालोचनाच्या भूमिकेत दिसत असून, भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान तो सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसाठी कॉमेंन्ट्री करत आहे.

मात्र गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी रहाणेने केलेल्या एका वेगळ्याच गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जाणारा अजिंक्य अचानक माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जोशपूर्ण अंदाजात बोलू लागला. त्याची ही भन्नाट मिमिक्री पाहून कॉमेंन्ट्री बॉक्समधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कॉमेंन्ट्री सुरू असतानाच बदलला रहाणेचा आवाज

गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणे माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्यासोबत समालोचन करत होता. चर्चेदरम्यान अचानक रहाणेने रवी शास्त्री यांच्या खास बोलण्याच्या शैलीची नक्कल करण्यास सुरुवात केली.

रवी शास्त्री यांचा दमदार आवाज आणि उत्साहाने भरलेला अंदाज क्रिकेट चाहत्यांना चांगलाच परिचित आहे. रहाणेनेही अगदी त्याच शैलीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याची आवाजाची लकब आणि बोलण्याचा अंदाज इतका मजेशीर होता की काही क्षणांसाठी कॉमेंन्ट्री बॉक्समध्ये रवी शास्त्रीच आले आहेत की काय, असे वाटावे.

रहाणेच्या या अनपेक्षित अवतारामुळे स्टुडिओमध्ये हशा पिकला. शांत आणि फार कमी बोलणारा क्रिकेटपटू अशी ओळख असलेल्या रहाणेकडून अशी मिमिक्री पाहायला मिळाल्याने अनेकजण चकित झाले. या क्षणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.

रवी शास्त्रींच्या शैलीची रहाणेला चांगलीच ओळख

रहाणे भारतीय संघासाठी खेळत असताना रवी शास्त्री हे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यामुळे शास्त्रींची बोलण्याची पद्धत, त्यांचा उत्साह आणि संघातील वावर रहाणेने जवळून पाहिला आहे.

याच अनुभवामुळे त्याने केलेली मिमिक्री अधिक नैसर्गिक आणि मजेशीर वाटली. मैदानावर गंभीर असणारा रहाणे कॉमेंन्ट्री बॉक्समध्ये मात्र वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाची आठवण

रहाणे आणि रवी शास्त्री यांची जोडी भारतीय क्रिकेटमधील 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे विशेष लक्षात राहते. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील मालिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय मालिकांपैकी एक मानली जाते.

अ‍ॅडलेड कसोटीत भारतीय संघाला अत्यंत खराब पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताचा डाव अवघ्या 36 धावांवर संपला होता. त्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर आली होती.

अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असतानाही रहाणेने संघाला एकत्र ठेवले. मेलबर्न कसोटीत त्याने शतक झळकावत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर सिडनीमध्ये भारतीय संघाने जबरदस्त लढत दिली आणि अखेर गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने मालिका 2-1 अशी जिंकली.

या संपूर्ण ऐतिहासिक दौऱ्यात कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे रहाणेने आज केलेली शास्त्रींची मिमिक्री पाहताना चाहत्यांना त्या ऐतिहासिक मालिकेचीही आठवण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT