

विवेक कुलकर्णी
क्रीडापटलावर कित्येक खेळाडू येतात, चौकार-षटकारांची आतषबाजी करतात आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात वाहून जातात; पण काही खेळाडू असे असतात जे शांतपणे येतात, वादळाचा मुकाबला करतात, संघाला संकटातून बाहेर काढतात आणि तरीही प्रसिद्धीपासून दूर राहतात. अजिंक्य रहाणे हे याच दुर्मीळ श्रेणीतील एक अभिजात खेळाडू. मैदानावर कितीही मोठे संकट असो, धावांचा दुष्काळ असो वा टीकेची झोड, अजिंक्य कधीही डगमगला नाही. तो फक्त खेळला नाही, तर भारतीय क्रिकेटसाठी प्रत्येक कठीण प्रसंगात लढत राहिला!
'ना हार में, ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं,
कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही, वह भी सही।'
अजिंक्य रहाणेच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीकडे पाहिले तर राष्ट्रकवी शिवमंगल सिंह 'सुमन' यांच्या या ओळी तंतोतंत लागू होतात. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज फलंदाज झाले, ज्यांनी विक्रमांचे डोंगर उभे केले; पण ज्या-ज्यावेळी संघ अडचणीत सापडला, भारतीय फलंदाजांनी नांगी टाकण्याची मालिकाच सुरू केली, समोरच्या बलाढ्य गोलंदाजांचा ताफा भारतीय फलंदाजीचे लचके तोडत होता, त्या-त्यावेळी त्या श्रेणीतील एक फलंदाज ढाल बनून उभा राहायचा, तो म्हणजे अजिंक्य रहाणे!
अत्यंत शांत स्वभाव, चेहऱ्यावर कधीही न मावणारी विनम्रता आणि डोळ्यांत फक्त आणि फक्त देशासाठी लढण्याची जिद्द, हाच अजिंक्यचा खरा परिचय. तसे पाहता, मुंबईच्या डोंबिवलीसारख्या मध्यमवर्गीय उपनगरातून भारतीय संघाचा उपकर्णधार होण्यापर्यंतचा अजिंक्यचा प्रवास सोपा अजिबात नव्हता. लोकल ट्रेनमधून किट बॅग घेऊन केलेला प्रवास आणि खडतर स्थानिक क्रिकेटमधील सातत्य यातून त्याचा पाया रचला गेला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर त्याला २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याला सलामीवीर, मधली फळी अशा वेगवेगळ्या क्रमांकावर खेळवले गेले; पण त्याने कधीही तक्रार केली नाही. २०१३ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि त्यानंतर २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात त्याने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. लॉर्डस्च्या ऐतिहासिक मैदानावर त्याने झळकावलेले शतक आजही भारतीय क्रिकेटमधील सर्वात क्लासिक शतकांपैकी एक मानले जाते.
परदेशातील संकटाचा 'तारणहार' : अजिंक्य रहाणे हा भारतीय खेळपट्ट्यांपेक्षा परदेशी आणि आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर अधिक खुलला. मेलबर्न, लॉर्डस्, डर्बन किंवा वेलिंग्टन असो, जिथे खेळपट्ट्यांवर चेंडू उसळत होता, तिथे अजिंक्यची बॅट बोलत राहिली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारासारखे फलंदाज अपयशी ठरत असतानाही अजिंक्यने मधली फळी अत्यंत मजबूतपणे सांभाळली. संकटसमयी तो केवळ धावा करत नव्हता, तर दुसऱ्या बाजूच्या फलंदाजाला धीर देत होता. 'तुफां में कश्ती को निकाल कर लाना जिसे आता है, इतिहास गवाह है, वही समंदर पर राज करता है।' हेच त्याने जणू खरे करून दाखवले.
कारकिर्दीतील सुवर्णक्षण : अजिंक्यच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ आणि भारतीय क्रिकेटचा सर्वात अभिमानास्पद क्षण म्हणजे २०२०-२१ ची ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी. ॲडलेड कसोटीत भारत अवघ्या ३६ धावांवर बाद झाला होता. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता आणि मुख्य गोलंदाज दुखापतग्रस्त झाले होते. अशा निराशेच्या गर्तेत अजिंक्यने संघाचे नेतृत्व स्वीकारले. मेलबर्न कसोटीत त्याने संयमाने संघाचे नेतृत्व केले आणि स्वतः ऐतिहासिक शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. त्याने केवळ सामना जिंकला नाही, तर खचलेल्या संघात प्राण फुंकले. त्यानंतर नवख्या पोरांना सोबत घेऊन 'गब्बा' या ऑस्ट्रेलियाच्या अभेद्य किल्ल्याला नेस्तनाबूत केले. हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आणि या विजयाचा शिल्पकार होता अजिंक्य रहाणे. त्याचा तो शांत आणि परिपक्व स्वभाव ऑस्ट्रेलियन स्लेजिंगला चोख उत्तर देणारा ठरला.
अपयशाचा काळ, टीकेचा भडिमार : प्रत्येक महान खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येतात. अजिंक्यच्या कारकिर्दीतही २०१७ नंतर फॉर्मची समस्या सुरू झाली. त्याच्या धावांचा ओघ आटत गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. त्याला संघातून डच्चू मिळाला. सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली; पण अजिंक्यने कधीही मैदानाबाहेर येऊन वादाला तोंड दिले नाही किंवा कोणावर दोषारोप केले नाहीत.
'खामोशी से बनाते रहो पहचान अपनी, हवाएं खुद तुम्हारा तराना गाएंगी' हेच जणू त्याचे ब्रीद होते. त्याने पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेटचा रस्ता धरला. रणजी ट्रॉफीमध्ये धावा केल्या, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना स्वतःच्या खेळात आक्रमक बदल घडवून आणला आणि सर्वांना थक्क केले. २०२३ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले आणि त्या कठीण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करत आपण अजूनही संपलेलो नाही, हे दाखवून दिले. अजिंक्य रहाणे हा कधीही वैयक्तिक विक्रमांसाठी खेळला नाही. कसोटी सामन्यात जेव्हा तो ८९ धावांवर बाद झाला, तेव्हा त्याला शतकाचा खेद नव्हता, तर संघ मजबूत स्थितीत पोहोचल्याचा आनंद होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने जेव्हा जेव्हा नेतृत्व केले, तेव्हा भारताने एकही कसोटी सामना गमावला नाही, तरीही विराट परत आल्यावर त्याने अत्यंत नम्रतेने उपकर्णधारपद स्वीकारले. अहंकाराचा लवलेशही नसलेला असा खेळाडू आधुनिक क्रिकेटमध्ये दुर्मीळच.
अशा या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी त्याची कारकीर्द येणाऱ्या पिढ्यांसाठी एक वस्तुपाठ आहे. क्रिकेट हे केवळ चौकार-षटकारांचे नाही, तर कठीण काळात खेळपट्टीवर टिकून राहण्याचे, अंगावर चेंडू झेलण्याचे आणि देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे नाव आहे, हे अजिंक्यने दाखवून दिले. तो कधीही प्रसिद्धीच्या शिखरावर राहिला नसेल; पण जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आणि कठीण विजयांचा उल्लेख होईल, तेव्हा अजिंक्य रहाणे हे नाव आदराने घेतले जाईल. थँक्यू अजिंक्य!