Vaibhav Suryavanshi IPL Future: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या दमदार फलंदाजीने त्याने क्रिकेटविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच त्याच्या भविष्यातील आयपीएल टीमबद्दल आता चर्चांना उधाण आले आहे.
सध्या राजस्थान रॉयल्स कडून खेळणारा वैभव सूर्यवंशी पुढील काही वर्षांत टीम बदलू शकतो का? आणि तो Royal Challengers Bengaluru चा नवा ‘पोस्टर बॉय’ ठरू शकतो का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. विशेषतः विराट कोहली नंतर RCB ला नवीन चेहरा हवा असेल, तर वैभव हा योग्य पर्याय ठरू शकतो, असे मत त्याचे कोच मनीष ओझा यांनी व्यक्त केले आहे.
पटण्यात ‘जेनेक्स’ अकॅडमी चालवणारे मनीष ओझा यांनी वैभवला लहानपणापासून ट्रेनिंग दिलं आहे. त्यांच्या मते, पुढील मेगा ऑक्शनमध्ये RCB वैभवला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करू शकते. कारण प्रत्येक फ्रँचायझीला एक मजबूत ब्रँड फेस हवा असतो आणि वैभवमध्ये ती क्षमता स्पष्टपणे दिसते.
मात्र वास्तव पाहिलं तर वैभवचं राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणं सध्या सोपं नाही. आयपीएलच्या नियमानुसार, प्रत्येक टीमला मेगा ऑक्शनपूर्वी 4-5 खेळाडूंना ‘रिटेन’ करण्याचा पर्याय असतो. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्स वैभवसारख्या उदयोन्मुख स्टारला सोडण्याची शक्यता फारच कमी आहे.
जर वैभवने स्वतःहून टीम बदलण्याची इच्छा व्यक्त केली, तरच समीकरण बदलू शकतं. अन्यथा, राजस्थान त्याला टिकवण्यासाठी 10-12 कोटी रुपये मोजायलाही मागेपुढे पाहणार नाही.
एकूणच, वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचा भविष्यातील मोठा स्टार मानला जात आहे. तो RCB चा पुढचा पोस्टर बॉय होईल की राजस्थानचाच स्टार राहील, हे येणाऱ्या काही वर्षांत स्पष्ट होईल. पण सध्या तरी त्याच्या खेळीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.