Rishabh Pant Trains With Yuvraj Singh  Pudhari
स्पोर्ट्स

Yuvraj Singh: करिअर धोक्यात! अभिषेक आणि सॅमसननंतर आता हा स्टार खेळाडू युवराजकडे; IPLमध्ये नशीब बदलणार?

Rishabh Pant IPL 2026: आयपीएल आधी ऋषभ पंत युवराज सिंहसोबत सराव करताना दिसला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कामगिरी सुधारण्यासाठी पंत फलंदाजी तंत्रात बदल करत आहे.

Rahul Shelke

Rishabh Pant IPL 2026: टी-२० विश्वचषक संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएलकडे लागले आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी अनेक खेळाडू तयारी करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत चर्चेत आहे. कारण, पंत सध्या भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहसोबत सराव करताना दिसत आहे.

अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युवराज सिंह नेट्समध्ये पंतच्या फलंदाजीवर बारकाईने लक्ष ठेवताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, आयपीएल २०२६ पूर्वी पंत आपल्या खेळात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

पंत युवराज सिंहकडे का गेला?

युवराज सिंहने मागील काही वर्षांत अनेक तरुण खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यांसारख्या खेळाडूंनी युवराजकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर जबरदस्त कामगिरी केली आहे.

टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वी संजू सॅमसन देखील युवराजकडे प्रशिक्षणासाठी गेला होता आणि त्याने स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच आता ऋषभ पंतनेही युवराजकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष

ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये निर्णायक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. मात्र, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेइतकी प्रभावी राहिलेली नाही.

याच कारणामुळे टी-२० विश्वचषक २०२६ साठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचे नाव फारसे चर्चेतही आले नाही. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी पंत प्रयत्न करत आहे.

फलंदाजीच्या तंत्रात बदल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंत युवराजच्या सूचनांनुसार फलंदाजीचा सराव करताना दिसतो. विशेष म्हणजे, डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्याने आपला बॅटिंग स्टान्स थोडा खुला केला आहे. त्यामुळे तो शॉट्स अधिक प्रभावीपणे खेळू शकतो.

आयपीएल २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी

ऋषभ पंत आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक चर्चेत होता. कारण लखनऊ सुपर जायंट्सने त्याला २७ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीत खरेदी केले होते. मात्र, त्या हंगामात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने संपूर्ण स्पर्धेत केवळ २६९ धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात त्याने शतक झळकावले नसते, तर त्याचा आकडा आणखी कमी राहिला असता.

आयपीएल २०२६ मध्ये नशीब बदलणार?

आता पंत आयपीएल २०२६ मध्ये दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. युवराज सिंहसारख्या अनुभवी खेळाडूचे मार्गदर्शन त्याला नक्कीच फायद्याचे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जर पंतने आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केली, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात पुनरागमन करण्याचा त्याचा मार्ग खुला होऊ शकतो. एकूणच, आयपीएल २०२६ पंतसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. युवराज सिंहचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तो पुन्हा एकदा आपल्या करिअरला नवी दिशा देऊ शकतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT