आयसीसीने ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर हा दिवस अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला, कारण या संघाच्या दोन प्रमुख खेळाडूंनी नंबर-१ चा मान मिळवला आहे. बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशा फरकाने जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या अनेक खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
राशिद खान पुन्हा एकदा जगातील नंबर-१ एकदिवसीय गोलंदाज बनला आहे, तर उमरजई याने एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. यासोबतच, इब्राहिम जादराननेही क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
बांगलादेशविरुद्ध ३-० च्या मालिका विजयात राशिद खानची कामगिरी सर्वात उत्कृष्ट ठरली. त्याने तीन सामन्यांत एकूण ११ बळी घेतले आणि याच जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला मागे टाकत तो पुन्हा एकदा जगातील नंबर-१ एकदिवसीय गोलंदाज बनला आहे. ७१० रेटिंगसह त्याने पहिल्या क्रमांकाची जागा पटकावली आहे.
राशिद खानच्या या मोठ्या झेपेमुळे एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत एकाच वेळी पाच खेळाडूंना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले आहे. या खेळाडूंमध्ये केशव महाराज (द. आफ्रिका), महीश तीक्षणा (श्रीलंका), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), कुलदीप यादव (भारत) आणि बर्नार्ड शोल्ट्झ (नामिबिया) यांचा समावेश आहे.
अव्वल १० गोलंदाजांच्या क्रमवारीत केशव महाराजचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचा नंबर-१ चा मुकुट हिरावला गेला असून, तो आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचप्रमाणे, तीक्षणा तिसऱ्या, आर्चर चौथ्या, तर कुलदीप पाचव्या स्थानावर खाली आले आहेत. बर्नार्ड शोल्ट्झ सहाव्या स्थानावर गेला आहे. राशिदने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही दोन स्थानांची झेप घेत चौथे स्थान मिळवले आहे.
अझमतुल्लाह उमरजईनेही मालिकेत प्रभावी कामगिरी केली. त्याने सात बळी घेतले आणि फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले. यामुळेच, तो एका स्थानाची प्रगती करत झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला मागे टाकून नंबर-१ एकदिवसीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे. अव्वल १० एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंमध्ये सिकंदर रझा (दुसरा) याव्यतिरिक्त मेहदी हसन मिराज (पाचवा), मायकल ब्रेसवेल (सहावा) आणि मिचेल सँटनर (सातवा) यांनाही नुकसान झाले आहे. हे सर्व खेळाडू एका-एका स्थानाने खाली घसरले आहेत. मोहम्मद नबी तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेतील 'प्लेअर ऑफ द सीरिज' ठरलेल्या इब्राहिम जादराननेही एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी प्रगती नोंदवली आहे. तो ८ स्थानांची झेप घेत आता थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.