AB de Villiers On Asia Cup Row :
आशिया कप २०२५ फायनलच्या बक्षीस वितरणाच्या वादाचा धुरळा काही केल्या खाली बसत नाहीये. आशिया क्रिकेट काऊन्सीलचे चेअरमन मोहसीन नक्वी आणि बीसीसीआय यांच्यातील टसल अजूनही सुरू आहे. भारतानं नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर नक्वी ही ट्रॉफी आपल्या हॉटेल रूमवर घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी ती टीम इंडियाला देण्यास नकार दिला अन् अनेक कारणं देणं सुरू केलं.
दरम्यान, या संपूर्ण वादावर विराट कोहलीचा जीवलग मित्र दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डी व्हिलियर्सनं आपलं मत व्यक्त केलं आहे. आश्चर्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणात एबी डिव्हीलियर्सनं एकप्रकारे टीम इंडियालाच दोषी धरलं आहे.
एबी म्हणाला, 'ज्या व्यक्तीच्या हातून ट्रॉफी मिळणार त्यावरून टीम इंडिया खुश नव्हती. मला वाटतं की या असल्या गोष्टी खेळाशी संबंधित नाहीयेत. राजकारण हे बाजूला ठेवलं पाहिजे. खेळाचं जग हे वेगळं आहे आणि ते त्या पद्धतीनंच साजरं केलं गेलं पाहिजे. जे काही घडलं ते दुःखद आहे. आशा आहे की भविष्यात या गोष्टी सोडवल्या जातील. अशा गोष्टी खेळ, खेळाडू, खेळ भावना आणि क्रिकेटपटू यांना एका अवघड परिस्थितीत नेऊन ठेवतात. मला याचाच तिटकारा आहे. ही खूप अवघड परिस्थिती असते.'
एबीनं जरी टीम इंडियाला बोल लावला असला तरी त्यानं भारताच्या सध्याच्या टी २० संघावर खूप खुश असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, 'आता आपण जे सर्वात महत्वाचं आहे त्याकडं लक्ष केंद्रीत करूया. भारत हा खूप सक्षम संघ दिसतोय. टी २० वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून पाहायचं झालं तर त्यांचा संघ खूप बलाढ्य वाटतोय. लक्षात ठेवा टी २० वर्ल्डकप फार लांब नाहीये. भारतीय संघात अनेक गुणी खेळाडू आहेत. त्यांनी मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावून दाखवली आहे. त्यामुळं भारतीय संघ खेळताना पाहणं भारी वाटतं.'